Union Budget 2023-2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकरी, महिला आणि गोरगरीबांसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या. दरम्यान, सीतारमण यांनी सांगितलं की, देशात आता सरकार स्वच्छता अभियानाला गती देईल. नाले आणि गटारांची सफाई अत्याधुनिक पद्धतीने केली जाईल. ही सफाई आता मशीन्सच्या सहाय्याने केली जाईल. आतापर्यंत सफाई कर्मचाऱ्यांना मॅनहोलमध्ये उतरून सफाई करावी लागत होती. मानवी हातांनी मैला साफ करण्याची पद्धत आता बंद होणार आहे.
अर्थमंत्र्यांच्या नवीन घोषणेनंतर आता सफाई कर्मचाऱ्यांना मॅनहोलमध्ये उतरावं लागणार नाही. आता हे काम मशीन्सद्वारे केलं जाईल. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज अशा मशीन्सचा वापर केला जाईल. जगभरातील अनेक देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
नक्की पाहा >> Video: कसा आहे केंद्रीय अर्थसंकल्प? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सविस्तर विश्लेषण
सफाई कामगारांच्या समस्या आणि मॅनहोलची स्वच्छता करताना होणारे मृत्यू ही देशासाठी चिंतेची बाब होती. परंतु यांत्रिकीकरणामुळे हे काम खूप सोपं होऊ शकतं. भारातल्या जवळपास सर्वच भागांमध्ये सांडपाणी आणि गटारांची साफसफाई ही अमानवी आणि असुरक्षितपणे केली जाते. पंरतु आता देशातली परिस्थिती बदलत आहे. स्वच्छतेच्या कामातही तंत्रज्ञानाची मदत होणार आहे. मशीन्सच्या सहाय्याने आता मॅनहोलची सफाई केली जाईल.
हे ही वाचा >> अर्थसंकल्पातील ‘सप्तर्षी’वरून रोहित पवारांचा मोदी सरकारला खोचक टोला; म्हणाले, “अजित पवारांनी…”
३३० सफाई कामगारांचा मृत्यू
केंद्र सरकारचा नवीन निर्णय खूप महत्त्वाचा आहे कारण मॅनहोलची सफाई करताना विषारी वायूमुळे अनेक सफाई कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या पाच वर्षांत गटार साफ करताना ३३० मजुरांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सरकारने पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत दिली होती. २०१७ ते २०२१ या ५ वर्षात एकट्या उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक ४७ सफाई कामगारांचा मृत्यू झाला आहे. या पाच वर्षांत २०१९ मध्ये सर्वाधिक ११६ मजुरांचा गटार साफ करताना मृत्यू झाला आहे.