Accenture to create 12000 jobs in India: आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी अ‍ॅक्सेंच्युअरने आंध्र प्रदेशात एक नवीन कॅम्पस स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यातून १२,००० नोकऱ्या निर्माण होणार आहेत. अमेरिकेने २१ सप्टेंबर २०२५ पासून एच-१बी व्हिसावर वार्षिक १ लाख डॉलर्स शुल्क जाहीर केल्यानंतर काही दिवसांतच अ‍ॅक्सेंच्युअरने हा निर्णय घेतला आहे.

या प्रकरणाशी संबंधित असलेल्या तीन सूत्रांचा हवाला देत रॉयटर्सच्या वृत्त दिले आहे की, अ‍ॅक्सेंच्युअरने आंध्र प्रदेश सरकारकडे विशाखापट्टणम येथे सुमारे १० एकर जमीन मागितली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याचा हवाला देत रॉयटर्सच्या वृत्तात म्हटले आहे की, आंध्र प्रदेश सरकार अ‍ॅक्सेंच्युअरच्या या प्रस्तावाबाबत उत्सुक असून, याला मंजुरी मिळण्यास वेळ लागू शकतो, परंतु प्रस्ताव मंजूर होण्याची अपेक्षा आहे.

“अ‍ॅक्सेंच्युअरने केलेली ही मागणी योग्य आहे आणि हा प्रस्ताव मंजूर केला जाईल”, असे एका अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले. पण, आंध्र प्रदेशात कॅम्पस उभारण्यासाठी अ‍ॅक्सेंच्युअर किती गुंतवणूक करणार आहे, हे स्पष्ट नाही.

जगभरात असलेल्या अ‍ॅक्सेंच्युअरच्या ७,९०,००० कर्मचाऱ्यांपैकी ३ लाखांपेक्षा जास्त कर्मचारी भारतात आहेत. इतर कोणत्याही देशात अ‍ॅक्सेंच्युअरचे भारतापेक्षा जास्त कर्मचारी नाहीत.

विशाखापट्टणम आयटी क्षेत्रासाठी आकर्षण केंद्र म्हणून उदयास येत आहे. टीसीएस आणि कॉग्निझंटने आधीच आंध्र सरकारच्या धोरणांतर्गत सुमारे २०,००० रोजगार निर्माण करू शकतील, असे कॅम्पस बांधण्यासाठी जमीन मिळवली आहे. कॉग्निझंटने आंध्र प्रदेशात १८३ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक जाहीर केली आहे, तर टीसीएसने सुमारे १५४ दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे.

महामारीनंतर, जमीन भाडे आणि वेतन खर्च कमी करण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी जागतिक आयटी कंपन्या टियर-२ भारतीय शहरांकडे वळत आहेत. कंपन्यांनाही स्थानिक कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देणे सोपे वाटत आहे. यामुळे बंगळुरू, हैदराबाद आणि पुणेसारख्या प्रमुख आयटी केंद्र असलेल्या शहरांतील प्रतिभावान कर्मचाऱ्यांचा स्थलांतरित होण्याचा कल बदलला आहे.