पीटीआय, नवी दिल्ली

ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडला (एचयूएल) प्राप्तिकर विभागाकडून ९६२.७५ कोटी रुपयांची कर थकबाकीची नोटीस बजावण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या या नोटिशीच्या विरोधात अपील करणार असल्याचे कंपनीकडून बुधवारी सांगण्यात आले.

हॉर्लिक्स, बूस्ट, माल्टोवा आणि व्हीआयआर या नाममुद्रांचा समावेश असलेल्या हेल्थ फूड्स ड्रिंक्स व्यवसायाच्या बौद्धिक संपदा अधिकारांच्या संपादनासाठी ग्लॅक्सो स्मिथक्लाइन कंझ्युमर हेल्थकेअरला ३,०४५ कोटी रुपये मोबदला दिला गेला, तेव्हा उद्गम कराची कपात न केल्याच्या संबंधित ही नोटीस आहे. एचयूएलच्या मते, प्राप्तिकर विभागाकडून मिळालेल्या नोटिशीच्या विरोधात अपील करणे आवश्यक आहे. कारण अमूर्त मालमत्तेच्या विक्रीतून निर्माण होणारे उत्पन्न हे भारतातील करविषयक कायद्याच्या अधीन नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>>फसलेल्या विलीनीकरणानंतर ‘झी-सोनी’कडून वादाचेही सामोपचाराने निराकरण

सुमारे ३१,७०० कोटी रुपयांच्या व्यवहारानंतर २०२० मध्ये एचयूएलने ग्लॅक्सो स्मिथक्लाइन कंझ्युमर हेल्थकेअरचे विलीनीकरण पूर्ण केले. या करारानुसार हॉर्लिक्स, बूस्ट आणि माल्टोवा या सारख्या ग्लॅक्सो स्मिथक्लाइनच्या नाममुद्रांचे अधिग्रहण करण्यासाठी ३,०४५ कोटी रुपये दिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसला देखील ३२,४०३ कोटी रुपयांच्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) न भरल्याप्रकरणी नोटीस प्राप्त झाली आहे. या विभागाने तत्सम नोटिसा अन्य अनेक कंपन्यांनाही धाडल्या आहेत.