पीटीआय, नवी दिल्ली

चालू वर्षात कंपन्यात उच्च पदावरील अधिकाऱ्यांना सरासरी २० टक्के वेतनवाढ मिळण्याची अपेक्षा करता येईल. मु्ख्यत: कंपन्यांकडून गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासह नावीन्यपूर्ण क्षेत्रांवर भर दिला जाईल, असा अंदाज गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या मायकेल पेज इंडियाच्या वेतन अहवालात वर्तविण्यात आला.

देशाच्या अर्थव्यवस्थेची आगेकूच सुरू असून, पारंपरिक उद्योगांसह निर्मिती आणि कार्यचालन क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकर भरती वाढणार आहे. डेटा ॲनालिटिक्स, जनरेटिव्ह एआय आणि मशिन लर्निंग यासारख्या व्यावसायिक कौशल्यांना मागणी वाढणार आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातील ६ टक्के वाढ ही देशांतर्गत गुंतवणूक आणि बाह्य घटकांपासून होणार आहे. जागतिक आव्हानांच्या काळातही भारताचे विकास मार्गक्रमण यामुळे सुरू राहील, असे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 4 April 2024: सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ; चांदीही ७९ हजार रुपयांच्या पुढे, पाहा आजचा भाव 

माहिती-तंत्रज्ञान सेवा क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक आहे. या कंपन्या सध्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत आहेत. त्यामुळे त्या मध्यम मार्ग स्वीकारून वेतनात ८ ते १० टक्के वाढ करतील. ग्राहकोपयोगी वस्तू, अपारंपरिक, वित्त आणि आरोग्यव्यवस्था या क्षेत्रांची वाढ होत आहे. क्षेत्रनिहाय विचार करता माहिती तंत्रज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात वेतनवाढीचे प्रमाण कनिष्ठ कर्मचारी ३५ ते ४५ टक्के, मध्यम फळीतील कर्मचारी ३० ते ४० टक्के आणि वरिष्ठ कर्मचारी २० ते ३० टक्के असे असेल. मालमत्ता व बांधकाम क्षेत्रात वेतनवाढीचे प्रमाण कनिष्ठ २० ते ३० टक्के, मध्यम २५ ते ४५ टक्के आणि वरिष्ठ २० ते ४० टक्के असेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र सध्या आशादायी आहे. करोना संकटाच्या पूर्वीच्या पातळीवर अर्थव्यवस्था पोहोचली आहे. त्यामुळे गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रांचा स्वीकार या बाबींवर आता भर दिला जाईल.- अंतिक अगरवाला, व्यवस्थापकीय संचालक, पेज ग्रुप