मुंबई : अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जने मुंबई आणि अहमदाबाद विमानतळांसाठी तुर्कीयेची कंपनी सेलेबीसोबतचा विमानतळ हाताळणी (ग्राउंड हँडलिंग) करार रद्द केला असल्याची गुरुवारी घोषणा केली. पहलगाममधील हल्ल्याचा सूड उगवत भारतीय सैन्य दलांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानला मदत करणाऱ्या या राष्ट्राबाबत एकंदर जनभावना लक्षात घेता हे पाऊल टाकले गेले आहे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला जोखमीच्या कारणास्तव तुर्कियेची ग्राउंड-हँडलिंग कंपनी सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा मंजुरी रद्द केल्यानंतर, अदानी एअरपोर्टकडून हा निर्णय घेण्यात आला. ‘सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयानंतर, आम्ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) आणि अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (एसव्हीपीआयए) येथे सेलेबीसोबतचा करार रद्द केला आहे. त्यानुसार, सेलेबीला ती हाताळत असलेली सर्व कामे तात्काळ कंपनीला सोपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,’ असे अदानींच्या मुंबई आणि अहमदाबाद विमानतळांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सेलेबीसोबत विमानतळांवरील ग्राउंड हँडलिंग करार रद्द केला असला तरी सेवांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ग्राहक सेवा आणि राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले.
सेलेबी एव्हिएशन इंडियाने मात्र भारतातील कामकाजाबाबत समाज माध्यमांवर फिरणाऱ्या सर्व दिशाभूल करणाऱ्या आणि चुकीच्या आरोपांचे स्पष्टपणे खंडन केले आहे. सेलेबी एव्हिएशन इंडिया ही भारतीय हवाई क्षेत्रात १५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत आलेली कंपनी असून, दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादसह नऊ विमानतळांवरील सेवांद्वारे ती १०,००० हून अधिक लोकांना रोजगार देते. जागतिक स्तरावर कार्यरत या कंपनीची बहुसंख्य मालकी ही कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती आणि पश्चिम युरोपमधील आंतरराष्ट्रीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे आहे.
इंडिगो-तुर्की एअरलाइन्स भागीदारी रद्द करण्यासाठी हालचाली
तुर्की एअरलाइन्ससोबत इंडिगोचा भाडेपट्टा करार थांबवण्यासाठी स्पर्धक एअर इंडियाने हालचाली सुरू केल्या आहेत. व्यवसायावर परिणाम तसेच तुर्कियेने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने निर्माण झालेल्या सुरक्षेच्या धोक्याकडे एअर इंडियाने भारतीय अधिकाऱ्यांकडे लक्ष वेधले आहे. भारत-पाकिस्तान संघर्षात पाकिस्तानला दिलेल्या समर्थनाच्या भूमिकेविरुद्ध जनतेत असलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर, तुर्कियेच्या विविध कंपन्यांसोबत करार रद्द केले जात आहेत. वर्ष २०२३ पासून, इंडिगोने तुर्की एअरलाइन्ससोबत भाडेपट्टा करार केला आहे, ज्याने इंडिगोला नवी दिल्ली आणि मुंबई ते इस्तंबूल मार्गांवर चालविण्यासाठी पायलट आणि काही कर्मचाऱ्यांसह दोन विमाने पुरविली गेली आहेत. दर सहा महिन्यांनी नूतनीकरण होणाऱ्या या भाडेपट्टा कराराला मुदतवाढ न देण्याची विनंती एअर इंडियाने देशाच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे केली आहे. इंडिगोचा चालू भाडेपट्टा करार ३१ मे पर्यंत वैध असून, त्याला मुदतवाढीसाठी तिने पुन्हा अर्ज केला आहे.
‘जीजेसी’चे सराफांना बहिष्काराचे आवाहन
ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (जीजेसी) शुक्रवारी देशांतर्गत तिचे सदस्य असलेल्या सराफांना तुर्किये आणि अझरबैजान सोबतचे सर्व व्यावसायिक व्यवहार स्थगित करण्याचे आवाहन केले. भारतीय रत्न आणि आभूषण क्षेत्राने कायम व्यापारापेक्षा देशाला प्राधान्य दिले आहे. यामुळे प्रत्येक सराफ, उत्पादक, व्यापारी आणि घाऊक विक्रेत्याला तुर्किये आणि अझरबैजान सोबतचे सर्व व्यवहार थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे जीजेसीचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले.
कायदेशीर उपायांचा ‘सेलेबी’कडून शोध
तुर्कीयेची सेलेबी हवा सर्व्हिसी त्यांच्या भारतीय कंपनीसाठी सुरक्षा मंजुरी रद्द केल्यानंतर भारतातील विविध परवाने आणि करारांच्या एकतर्फी बडतर्फीला आव्हान देण्यासाठी कायदेशीर उपायांचा शोध घेत आहे. तुर्कीयेच्या शेअर बाजारात सूचिबद्ध सेलेबी हवा सर्व्हिसीच्या विविध उपकंपन्यांचे कामकाज भारतात स्थगित करण्यात आले आहे. सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. (सीएएसआय), सेलेबी जीएच इंडिया प्रा. लि. (सीजीएचआय), सेलेबी नास एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सेलेबी दिल्ली कार्गो टर्मिनल मॅनेजमेंट इंडिया प्रा. लि. आणि सेलेबी जीएस चेन्नई प्रा. लि. (सीजीएससी) यांचा त्यात समावेश आहे.