अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या १,००० कोटी रुपयांच्या अपरिवर्तनीय रोख्यांना अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून अवघ्या तीन तासांत १०० टक्के भरणा झाला. भांडवलाची पूर्तता करण्यासाठी निधी उभारणीकरिता उपलब्ध विविध पर्यायात कंपन्यांकडून अपरिवर्तनीय रोख्यांची (एनसीडी) विक्री करण्यात येते.
थोडक्यात, एनसीडी हे गुंतवणूकदारांकडून निधी उभारण्यासाठी कंपन्यांद्वारे जारी केलेले कर्ज साधन आहेत, जे निश्चित दराने व्याज देतात. बुधवारी खुला झालेला आणि येत्या २२ जुलैला बंद होणाऱ्या एनसीडीला मोठा प्रतिसाद मिळाल्याने कंपनीकडून एनसीडी लवकर बंद केल्या जाण्याची शक्यता आहे.
अदानी समूहातील या कंपनीने वार्षिक ९.३ टक्के व्याज देण्याचे आश्वासन दिले आहे. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, १,००० कोटी रुपयांच्या एनसीडीसाठी १,४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या बोली प्राप्त झाल्या आहेत. एनसीडीचे प्रत्येकी दर्शनी मूल्य १,००० रुपये आहे. अर्जदार किमान १० एनसीडी आणि त्यानंतर १ एनसीडीच्या पटीत अर्ज करू शकतात, ज्यामुळे किमान अर्जाचे आकारमान १०,००० रुपये आहे.