नवी दिल्ली: अदानी समूहावरील कर्जाचा बोजा मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २१ टक्क्यांनी वाढला आहे. यात आंतरराष्ट्रीय बँकांच्या कर्जाचे प्रमाण वाढून एक तृतीयांश पातळीवर गेले आहे, असे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ने दिले आहे.

समूहाच्या निव्वळ कर्जाचे कंपन्यांच्या एकत्रित व्याज, कर व घसारापूर्व उत्पन्नाशी गुणोत्तर मागील आर्थिक वर्षात ३.२ टक्के होते. हे प्रमाण सप्टेंबर २०१३ मध्ये नोंदवल्या गेलेल्या ७.६ टक्क्यांच्या तुलनेत लक्षणीय घसरले आहे. अदानी समूहातील प्रमुख सात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण कर्ज ३१ मार्चअखेर वार्षिक तुलनेत २०.७ टक्क्यांनी वाढून २.३ लाख कोटी रुपयांवर (२८ अब्ज डॉलर) पोहोचले आहे. समूहावरील कर्जाचा बोजा २०१९ पासून सातत्याने वाढत आहे आणि सध्या तो कमी करण्यासाठी समूहाकडून तातडीने पावले उचलली जात आहेत. तथापि, समूहाची कर्ज परतफेड करण्याची क्षमताही वाढल्याचे ताजी आकडेवारी दर्शविते.

हेही वाचा…. कॅपिटल गेन टॅक्समध्ये कोणताही बदल होणार नाही, प्राप्तिकर विभागाने अफवा फेटाळल्या

अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने वित्तपुरवठा आणि त्याचा स्रोत अर्थात कर्जदाते यात कशा पद्धतीने बदल केला, हे आकडेवारीतून स्पष्ट होते. समूहातील माहीतगार सूत्रांनी दिलेली माहिती आणि गुंतवणूकदारांसमोर कंपन्यांनी केलेले सादरीकरण यातून ही मार्च २०२३ अखेरची ही आकडेवारी समोर आली आहे. अदानी समूहावरील कर्जामध्ये आंतरराष्ट्रीय बँकांच्या कर्जाचा वाटा २९ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, अदानी समूहाच्या कर्जदात्यांच्या यादीत सात वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बँका ही वर्गवारीच नव्हती.

हेही वाचा…. Gold-Silver Price on 19 April 2023: सोन्या-चांदीची घोडदौड, चमक पुन्हा वाढली, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

अदानी समूहाने गुजरात राज्यातून आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करीत ऑस्ट्रेलिया आणि इस्रायल यांसारख्या देशांमध्ये व्यवसाय विस्तार केला, परंतु हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमेला धक्का बसला आहे. समूहाचे अनेक व्यवसाय आता नियामक यंत्रणांच्या रडारखाली आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अदानी समूहाचे वरिष्ठ अधिकारी गुंतवणूकदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या शंकांचे समाधान करीत आहेत. समूह कर्जाची परतफेड करीत असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी समूहातील कंपन्यांचे समभाग आणि डॉलरमधील रोखे यांचे मूल्य अद्याप पूर्वपदावर आलेले नाही. कर्जाचे गुणोत्तर सुधारण्यासाठी अदानी समूहातील कंपन्यांकडून निधीची उभारणी केली जाऊ शकते. असे असले तरी जागतिक पतमानांकन संस्था समूहातील कंपन्यांच्या निधी उभारणीच्या क्षमतांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.