मुंबई : अदानी समूहाची ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेली अदानी पॉवर समभाग विभाजनाची (स्टॉक स्प्लिट) योजना आखत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची येत्या १ ऑगस्ट रोजी बैठक पार पडणार असून सरलेल्या जून तिमाहीची कंपनीची आर्थिक कामगिरी देखील जाहीर केली जाणार आहे.

समभाग विभाजनाचे वृत्त आल्यांनतर मुंबई शेअर बाजारात अदानी पॉवरच्या समभागाने ४ टक्क्यांची उसळी घेतली. १ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत इतर गोष्टींबरोबरच, कंपनीच्या भागधारकांच्या मान्यतेनुसार आणि लागू कायद्यानुसार आवश्यक असलेल्या नियामक मंजुरीच्या अधीन राहून, १० रुपये दर्शनी मूल्याच्या विद्यमान समभागांचेविभाजन करून कंपनीच्या शेअर भांडवलात बदल करण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाईल, असे कंपनीने बाजार मंचांना मंगळवारी कळवले.

गेल्या तिमाहीत म्हणजेच ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत अदानी पॉवर लिमिटेडचा एकत्रित निव्वळ नफा ५ टक्क्यांनी कमी होऊन २,५९९ कोटी रुपयांवर पोहोचला होता, जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील २,७३७ कोटी रुपयांच्या तुलनेत कमी आहे.

मंगळवारच्या सत्रात अदानी पॉवरचा समभाग २२.८५ रुपयांनी वधारून ५९३.५० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे २,२८,९०९ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समभाग विभाजन म्हणजे काय?

समभाग विभाजन म्हणजे एका समभागांचे समान भागात विभाजन केले जाते. यामुळे कंपनीचे दर्शनी मूल्य कमी होत असले तरी विभाजन झाल्याने महागडा वाटणारा समभाग आवाक्यात येतो. उदा दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या समभागाचे विभाजन दोन भागात करण्यात आले तर भागधारकांच्या खात्यात त्या कंपनीचे ५ रुपये दर्शनी मूल्य असलेले दोन समभाग जमा होतील. शिवाय कंपनीच्या समभागाचे बाजारमूल्य सुद्धा निम्मे होईल.

डिस्क्लेमर : कोणतीही कंपनी बक्षीस (बोनस), लाभांश (डिव्हिडंड ) किंवा समभाग विभाजन (स्टॉक स्प्लिट) करणार म्हणून त्या कंपनीच्या शेअरची खरेदी करू नये. आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्च करून आणि स्वतः कंपनीच्या फंडामेंटल्सचा अभ्यास करून समभाग खरेदीचा निर्णय घ्यावा.