पीटीआय, वॉशिंग्टन
मूळ भारतीय वंशाचे व्यावसायिक अजय बंगा यांची बुधवारी जागतिक बँकेचे आगामी अध्यक्ष म्हणून नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या जागतिक वित्तीय संस्थेची धुरा सांभाळणारे ते पहिले भारतीय-अमेरिकन नागरिक असतील.
जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांकडून बुधवारी अजय बंगा यांची २ जून २०२३ पासून सुरू होणाऱ्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, असे जागतिक बँकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले. ते मावळते अध्यक्ष डेव्हिड मलपास यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारतील. सरलेल्या फेब्रुवारीमध्ये, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जागतिक बँकेचे नेतृत्व करण्यासाठी ६३ वर्षीय बंगा यांच्या नावाची शिफारस केली होती. या पदासाठी दावेदारी करणारे एकमेव नामांकन केवळ बंगा यांच्याकडून दाखल झाले होते.
वर्ष २०१६ मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले बंगा यांची सुमारे २४,००० कर्मचारी असलेल्या मास्टरकार्ड या जागतिक संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कारकीर्द राहिली आहे. ते अलीकडेपर्यंत जनरल अटलांटिकमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम कार्यरत होते.