Amul cuts prices of 700 products from September 22 ghee gets cheaper by Rs 40 per litre check list : भारत सरकारने वस्तू आणि सेवा करामध्ये कपातीचा निर्णय घेतल्याचा फायदा अनेक कंपन्यांकडून ग्राहकांना दिला जात आहे. यातच आता आणखी एकाची भर पडली आहे. ‘अमूल’ ब्रँडची उत्पादने विकणाऱ्या गुजरातमधील कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने शनिवारी जीएसटी दर कपातीचा फायदा त्यांच्या ग्राहकांना देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार अमूलचे तूप, बटर आइस्क्रीम यासह ७०० हून अधिक उत्पादनांच्या पॅकची किरकोळ किंमत कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या नवीन किंमती २२ सप्टेंबरपासून लागू होतील.
एका निवेदनात, GCMMF ने २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणऱ्या ७०० हून अधिक उत्पादनाच्या पॅकच्या सुधारित किंमतीची यादी जाहीर केली आहे. जीएसटी दरामध्ये झालेल्या कपातीचा पूर्णपणे लाभ ग्राहकांना दिला जाईल असे कंपनीने म्हटले आहे. बटर, तूप, यूएचटी दूध, आईस्क्रीम, चीज, पनीर, चॉकलेट, बेकरी रेंज, फ्रोझन डेअरी आणि पोटॅटो स्नॅक्स, कंडेन्स्ड मिल्क, पीनट स्प्रेड, माल्ट-बेस्ड पेये अशा विविध श्रेणीमधील उत्पादनांच्या किंमतीमध्ये ही सुधारीत दर लागू केले जातील, असे जीसीएमएमएफने म्हटले आहे.
किंमतीमध्ये झालेल्या काही महत्त्वाचे बदल
- बटरची (१०० ग्रॅम) एमआरपी ६२ रुपयांवरून ५८ रुपये करण्यात आली आहे.
- तुपाचे दर ४० रुपयांनी कमी करून ६१० रुपये प्रति लिटर करण्यात आले आहेत.
- अमूल प्रोसेस्ड चीज ब्लॉक (१ किलो) ची एमआरपी ३० रुपयांनी कमी करून ५४५ रुपये प्रति किलो करण्यात आली आहे.
- फ्रोझन पनीरची (२०० ग्रॅम) एमआरपी ९९ रुपयांवरून ९५ रुपये करण्यात आली आहे.
कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, “अमूलचा विश्वास आहे की किमतीत कपात केल्याने डेअरी उत्पादने, विशेषतः आयस्क्रीम, पनीर आणि बटर यांची खप वाढेल कारण भारतात प्रति व्यक्ती खप अजूनही खूपच कमी आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढीची संधी निर्माण होईल.”
मदर डेअरीनेही कमी केल्या किंमती
अमूलच्या आधी मदर डेअरीने देखील २२ सप्टेंबर पासून दूधाच्या दरांमध्ये २ रुपये प्रति लीटरची कपात जाहीर केली होती. याबरोबरच पनीर, बटर, चीज आणि आयस्क्रीमच्या किंमतीदेखील कमी केल्या आहेत.