पुणे : अमेरिकेने आकारलेले अतिरिक्त आयुक्त शुल्क आणि उत्तर अमेरिकेतील प्रदूषण नियमांमधील बदलांमुळे आम्ही निर्यातीबाबत सावधगिरी बाळगत आहोत. जागतिक पातळीवरील घडामोडी पाहता चालू आर्थिक वर्ष एकूण आर्थिक चक्र आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता आव्हानात्मक असेल, असे मत भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांनी व्यक्त केले.

भारत फोर्जने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याणी म्हणाले की, जागतिक पातळीवरील आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तुलनेत कमी प्रभावित असलेल्या क्षेत्रांमध्ये संधी शोधण्याची आवश्यकता आहे. एकाचवेळी खर्चात कपात करून कार्यान्वयन उत्पन्नावरील परिणाम कमी करण्याचे आमचे उद्दिष्ट राहील. कंपनीने एप्रिल ते जून तिमाहीत अमेरिकी आणि युरोपीय व्यवसायाच्या आर्थिक कामगिरीत लक्षणीय सुधारणा केली आहे. युरोपीय पोलाद उत्पादन क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा आढावा सुरू आहे आणि वर्षाअखेरपर्यंत याबाबत ठोस निर्णय घेतले जातील.

पहिल्या तिमाहीत कंपनीने ८४७ कोटी रुपयांचे नवीन कार्यादेश मिळवले असून, त्यात संरक्षण क्षेत्रातील २६९ कोटींच्या कार्यादेशांचा समावेश आहे. कंपनीकडे पहिल्या तिमाही अखेरीस एकूण संरक्षण कार्यादेश ९ हजार ४६३ कोटी रुपयांचे आहेत. संरक्षण क्षेत्रामध्ये चालू आर्थिक वर्षात अधिक नवीन कार्यादेश मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे आगामी वर्षांमध्ये आणखी महसूल निर्मिती शक्य होईल, असेही कल्याणी यांनी नमूद केले.

भारत फोर्जला ३३९ कोटींचा तिमाही नफा

भारत फोर्जला चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत ३३९ कोटी रुपयांचा करोत्तर नफा झाला आहे. कंपनीने पहिल्या तिमाहीत २ हजार १०५ रुपयांचा महसलू मिळविला आहे. कंपनीचा करपूर्व नफा ४६५ कोटी रुपये आहे.