वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने चालू महिन्यापासून पाश्चिमात्य देशांनी निर्धारित केलेल्या खनिज तेल किमतीच्या मर्यादेपेक्षा जास्त किमतीला विकल्या जाणाऱ्या रशियन तेलाची देणी पूर्ण करण्याची प्रक्रिया थांबवण्याचे पाऊल टाकले आहे.
युक्रेनवरील आक्रमणानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादल्यानंतर, भारतीय आयातदारांनी रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी सुरू केली आणि सध्या तो भारतासाठी सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला आहे. ‘ओपेक प्लस’ देशांच्या उत्पादनात कपातीच्या ताज्या निर्णयामुळे जागतिक तेलाच्या किमतीत तीव्र वाढ झाल्यामुळे, रशियन तेलाच्या किमतीही निर्धारित मर्यादा ओलांडल्या जाण्याची शक्यता पाहता, बँक ऑफ बडोदाचे हे पाऊल लक्षणीय ठरते.
हेही वाचा – विकास दर मंदावणार! जागतिक बँकेकडून चालू आर्थिक वर्षासाठीचा सुधारित अंदाज
भारतीय तेल आयातदार हे रशियन तेलाच्या खरेदीसाठी पिंपामागे ६० डॉलरची मर्यादा ठेवून बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून संयुक्त अरब अमिरातीचे चलन असलेल्या दिरहमच्या माध्यमातून देणी भागवत आहेत. रशियाच्या युद्धखोरीची आर्थिक रसद तोडण्यासाठी आणि त्याची आर्थिक कोंडी करण्यासाठी आयात होणाऱ्या तेलावर पाश्चिमात्य देशांनी, किंमत प्रतिबंध लादले आहेत. शिवाय युरोपीय महासंघासह ऑस्ट्रेलियानेही रशियन तेलाच्या आयातीसाठीही किंमत मर्यादा निश्चित केली आहे. परिणामी बँक ऑफ बडोदाने रशियन तेल खरेदी करताना, ती ६० डॉलर या निश्चित केलेल्या किंमत मर्यादेपेक्षा अधिक रकमेची देणी पूर्ण केली जात असताना सावधगिरीचे हे पाऊल टाकले आहे.
भारताने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय व्यापार रुपयामध्ये करण्यासाठी यंत्रणा उभारली. यासाठी काही रशियन बँकांनी विशेष ‘रुपी व्होस्ट्रो खाती’ उघडली. रुपी व्होस्ट्रो खाते हे परदेशी बँकेने भारतीय चलनात शिल्लक असलेले भारतीय बँकेतील खाते आहे. मात्र रशियाकडून मोठ्या प्रमाणावर रुपया चलन स्वीकारण्याबाबत मर्यादा आणि भारताच्या मोठ्या व्यापारी तुटीमुळे ही यंत्रणा कार्यान्वित होऊ शकली नाही. मात्र, गेल्या आठवड्यात भारत दौऱ्यावर आलेल्या रशियन तेल कंपनी ‘रोझनेफ्ट’चे मुख्य कार्यकारी इगोर सेचिन यांनी रुपयांमध्ये व्यवहार करण्याच्या शक्यतेसह भारताशी सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली.
हेही वाचा – Bank FD : ‘या’ सरकारी बँकेने एफडीवर व्याज वाढवले, गुंतवणूकदारांना मिळतोय मजबूत फायदा
तेलाच्या किमतीतील चढ कायम!
रशियासह, ‘ओपेक प्लस’ देशांनी अतिरिक्त उत्पादन कपात करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किमती सलग दुसऱ्या सत्रात भडकल्या आहेत. मंगळवारी ब्रेंट क्रूड फ्युचर्स ०.५ टक्क्यांनी वधारून ८५.३६ प्रति बॅरल, तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड फ्युचर्स ०.६ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ८०.८९ डॉलरवर व्यवहार करत होते. ओपेकच्या उत्पादन कपातीचा परिणाम म्हणून या किमती पिंपामागे १०० डॉलरपर्यंत लवकरच तापतील, असे विश्लेषकांनी म्हटले आहे.