मुंबई : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपातीचा निर्णय घेतल्यानंतर काही तासांतच सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया आणि यूको बँकेने कर्जदरात पाव टक्के (२५ आधार बिंदू) कपातीची घोषणा बुधवारी सायंकाळी केली. ज्यामुळे विद्यमान ग्राहकांसह नवीन कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. नवीन ग्राहकांना गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज कमी दराने मिळविता येईल.
रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा व्याजदर कपात केल्याने बँकांनी देखील ग्राहकांना दर कपातीचा लाभ देऊ केला आहे. येत्या काही सत्रात इतर बँकांकडूनही लवकरच अशाच प्रकारच्या घोषणा होण्याची अपेक्षा आहे. बँक ऑफ इंडियाचा नवीन रेपो आधारित कर्जदर (ईबीएलआर) पूर्वीच्या ९.१० टक्क्यांवरून ८.८५ टक्के करण्यात आला आहे. हे नवीन दर बुधवारपासूनच लागू करण्यात आले आहेत. यूको बँकेने देखील रेपो संलग्न कर्जदर गुरुवारपासून ८.८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे.