मुंबई: वाहनांच्या सुट्या भागांच्या निर्मात्री बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या २१ मेपासून सुरू होणार आहे. पुढील तीन दिवस म्हणजे २३ मेपर्यंत गुंतवणूकदारांना या विक्रीत सहभागी होऊन बोली लावता येईल. तर सुकाणू गुंतवणूकदारा २० मे रोजी समभाग खरेदीसाठी बोली लावतील.
बेलराईज इंडस्ट्रीजने आयपीओच्या माध्यमातून २,१५० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे लक्ष्य निश्चित केले असून, यासाठी प्रति समभाग ८५ रुपये ते ९० रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे. या माध्यमातून संपूर्णपणे नवीन समभागांची विक्री केली जाणार आहे. वैयक्तिक गुंतवणूकदार किमान १६६ समभाग आणि त्यानंतर १६६ समभागांच्या पटीत बोली लावू शकतील. आयपीओतून मिळणाऱ्या निधीपैकी १,६१८ कोटी रुपयांच्या रकमेचा वापर कर्ज परतफेडीसाठी केला जाणार आहे. डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत कंपनीवरील कर्जाचे प्रमाण सुमारे २,६०० कोटी रुपये आहे.
बेलराईज इंडस्ट्रीज ही प्रामुख्याने वाहनांसाठी सुट्या घटकांची उत्पादक आहे, जी दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, वाणिज्य वापराची वाहने आणि कृषी वाहनांसाठी विविध प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती करते. तिची उत्पादने ऑस्ट्रिया, स्लोव्हाकिया, ब्रिटन, जपान आणि थायलंडसह अनेक बाजारपेठांमध्ये वितरित होतात. देशांतर्गत आघाडीवर बजाज ऑटो, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया, हीरो मोटोकॉर्प, जग्वार लँड रोव्हर आणि रॉयल एनफील्ड मोटर्स सारख्या प्रमुख कंपन्या तिच्या ग्राहक आहेत. डिसेंबर २०२४ पर्यंत १० राज्यांमध्ये तिचे १७ उत्पादन प्रकल्प कार्यरत आहेत.