मुंबई : सरकारी मालकीची तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा (बीपीसीएल) निव्वळ नफा सरलेल्या जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत वार्षिक तुलनेत १६८.८ टक्क्यांनी म्हणजे जवळपास अडीच पटींहून अधिक वाढून ६,४४२.५३ कोटी रुपये झाला आहे. गतवर्षी याच तिमाहीत कंपनीने २,३९७.२३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.या चांगल्या नफ्याच्या कामगिरीमागे एकूण तेलशुद्धीकरणामधील (रिफायनिंग मार्जिन) फायदा हे प्रमुख कारण आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत प्रति पिंपामागे तेलशुद्धीकरणातील लाभ सुमारे २७ टक्के वाढून ७.७७ डॉलर झाला आहे.

रिफायनिंग मार्जिन म्हणजे शुद्ध पेट्रोलियम उत्पादनांची बाजार किंमत आणि ते तयार करण्यासाठी वापरात आलेल्या खनिज तेलाच्या किमतीतील फरक होय. अर्थात खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील घसरणीचे प्रतिबिंब बीपीसीएलच्या तिमाही कामगिरीत उमटले आहे.उल्लेखनीय म्हणजे बीपीसीएलचे तिमाही निकाल हे इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या या अन्य सरकारी तेल कंपन्यांच्या निकालांशी सुसंगत आहेत. या कंपन्यांनीही जुलै-सप्टेंबर तिमाहीत रिफायनिंग मार्जिन आणि नफ्यात लक्षणीय वाढ नोंदवली आहे.

सप्टेंबरअखेर तिमाहीत बीपीसीएलचा महसूल देखील वार्षिक तुलनेत ३.३ टक्क्यांनी वाढून १.२२ लाख कोटी रुपये झाला. देशांतर्गत बाजारातील विक्रीत किरकोळ वाढ झाल्यामुळे हे घडून आले. विक्री या तिमाही कालावधीत सुमारे २.३ टक्के वाढली.भारत पेट्रोलियमने प्रति समभाग ७.५ रुपयांचा अंतरिम लाभांश देखील जाहीर केला आहे. यासाठी रेकॉर्ड तारीख ही २९ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे त्या तारखेला अथवा तारखेपर्यंत नोंद भागधारक हा लाभांश मिळविण्यास पात्र ठरतील.

भारत पेट्रोलियमचे शेअर्स BSE वर 0.24% घसरून ₹356.80 वर आणि NSE वर 0.39% घसरून ₹356.20 वर बंद झाले.