मुंबई : येत्या आठवड्यात तीन मोठ्या कंपन्यांचे विशाल ‘आयपीओ’ बाजारात धडकणार असून, या माध्यमातून ३०,००० कोटींची निधी उभारणी केली जाणार आहे. या कंपन्यांमध्ये टाटा कॅपिटल, एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया आणि वीवर्क इंडियाचा समावेश आहे.
वीवर्क इंडिया ही को-वर्किंग स्पेस क्षेत्रातील कंपनी ३,००० कोटी रुपयांचा निधी उभारू इच्छित आहे. आयपीओसाठी प्रति समभाग ६१५रुपये ते ६४८ रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केला आहे. हा आयपीओ शुक्रवार, ३ ऑक्टोबरपासून खुला होणार असून, त्यासाठी गुंतवणूकदारांना ७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
तर टाटा समूहातील बॅंकेतर वित्तीय कंपनी असलेली टाटा कॅपिटल १५,५१२ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे, ज्यामुळे या वर्षातील सर्वात मोठा ‘आयपीओ’ ठरला आहे. यासाठी ३१० रुपये ते ३२६ रुपये प्रति समभाग असा किंमत पट्टा निश्चित केला आहे. हा आयपीओ ६ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान खुला राहणार आहे.
तसेच दक्षिण कोरियाच्या एलजी समूहाची भारतातील कंपनी असलेल्या ‘एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया’चा आयपीओ ७ ऑक्टोबरला खुला होत असून गुंतवणूदारांना ९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून ११,६०७ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. यासाठी १,०८० रुपये ते १,१४० रुपये प्रति समभाग किंमतपट्टा कंपनीने निश्चित केला आहे.
या तिन्ही कंपन्यांच्या आयपीओची गुंतवणूकदार मोठ्या कालावधीपासून प्रतीक्षा करत होते. असूचिबद्ध समभागांच्या बाजारपेठेत या कंपन्यांच्या समभागांना ‘आयपीओ’पूर्व चढाओढीने मागणीमुळे लक्षणीय किंमत मिळत होती. प्रत्यक्षात आयपीओसाठी जाहीर किंमत पट्टा त्या तुलनेत खूप कमी राखला गेल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला असला, तरी या समभागांचे आताही ‘ग्रे मार्केट प्राइस’ (जीएमपी) अधिमूल्य राखून असल्याचे दिसते.
भारतीय भांडवली बाजाराने जागतिक स्तरावरील अव्वल आयपीओ बाजारपेठ म्हणून बिरुद कायम राखले आहे. विद्यमान कॅलेंडर वर्ष २०२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत २४० हून अधिक लहान, माध्यम आणि मोठ्या आकाराच्या कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून ८७,५०० कोटी रुपयांची निधी उभारणी केली आहे. आठवड्यानंतर हे प्रमाण १.१८ लाख कोटी रुपयांवर जाईल. ज्यामुळे आयपीओ निधी उभारणीच्या बाबतीत देश जगातील तिसरा सर्वात मोठा बाजार बनला आहे.
आयपीओ किंमतपट्टा (रु.) / जीएमपी
- टाटा कॅपिटल ३१० / ३२६ – ७%
- एलजी इंडिया १,०८० / १,१४० – ११%
- वीवर्क इंडिया ६१५ / ६४८ – ५%