पीटीआय, नवी दिल्ली
खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या फेडरल बँकेच्या संचालक मंडळाने ब्लॅकस्टोन या जागतिक पातळीवरील कंपनीला सुमारे ६,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास मान्यता दिली आहे. ब्लॅकस्टोन आता फेडरल बँकेची ९.९९ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे.
फेडरल बँकेकडून सुमारे ६,२०० कोटी रुपये मूल्याच्या प्रेफरन्सियल वॉरंटचे वाटप केले जाणार आहे. यानंतर बँकेमधील हिस्सेदारी ५ टक्क्यांपुढे जाणार असल्याने ब्लॅकस्टोनला संचालक मंडळावर एक गैर-कार्यकारी संचालक नियुक्त करण्याचा विशेष अधिकार प्राप्त झाला आहे. फेडरल बँक प्रतिसमभाग २२७ रुपयांनी २७.२९ कोटींहून अधिक प्रेफरन्सियल वॉरंटचे वाटप करणार आहे. सध्या देशांतर्गत आघाडीवर मध्यम आकाराच्या भारतीय बँकांमध्ये हिस्सेदारी खरेदी करण्यास उत्सुक असलेल्या परदेशी गुंतवणूकदारांची संख्या वाढते आहे.
बँकेची मालकी प्रवर्तकांकडे नसून संपूर्ण मालकी सार्वजनिक भागधारकांकडे आहे. यासाठी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी भागधारकांची एक असाधारण सर्वसाधारण सभा बोलावली आहे, ज्यामध्ये प्रेफरन्सियल वॉरंटच्या वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल.
शुक्रवारच्या सत्रात फेडरल बँकेचा समभाग २२७.४० रुपयांवर स्थिरावला. सध्याच्या शेअर बाजारभावानुसार, बँकेचे ५५,९२९ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.
