मुंबई: जर्मनीची आघाडीची वाहन निर्माती बीएमडब्ल्यू इंडियाने येत्या १ सप्टेंबरपासून वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व श्रेणीतील वाहनांच्या किमती ३ टक्क्यांची वाढवण्याची तिने गुरुवारी घोषणा केली.
परकीय चलनातील सततच्या चढ-उतारांचा आणि जागतिक पुरवठा साखळीतील गतिमानतेचा प्रतिकूल परिणाम कंपनीवर झाल्याने वाहनांच्या किमती वाढवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. बीएमडब्ल्यू सध्या विद्युत शक्तीवर चालणारी (ईव्ही) अनेक आलिशान वाहने आणि एसयूव्ही विकते. याच श्रेणीतील २ सिरीज ग्रॅन कूपची किंमत ४६.९ लाख रुपये आणि बीएमडब्ल्यू एक्सएमची किंमत २.६ कोटी रुपयांपासून पुढे सुरू होते.
वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बीएमडब्ल्यू इंडियाची वाढ आणि विक्रीची गती उल्लेखनीय राहिली आहे. तथापि, सतत परकीय चलनावर परिणाम आणि जागतिक पुरवठा साखळीतील गतिमानता यासारख्या घटकांमुळे कच्चा माल, उत्पादन साहित्य आणि लॉजिस्टिक्स खर्चात वाढ झाली आहे, असे बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पावह म्हणाले. सणासुदीच्या काळात कंपनी अनेक आधुनिक सुविधांसह पॉवर-पॅक्ड प्रोफाइल सादर करण्यास सज्ज आहोत. बीएमडब्ल्यूच्या आलिशान, अग्रगण्य वाहनांची मागणी वाढते आहे. उत्पादन खर्चाचा वाढत्या भाराने दबाव वाढत असला तरी ग्राहकांना उत्तम सेवा प्रदान करू, असे पावह म्हणाले.
बीएमडब्ल्यूने या आधी १ एप्रिल २०२५ मध्ये बीएमडब्ल्यू आणि मिनी कार श्रेणीतील वाहनांच्या किमती तीन टक्क्यांपर्यंत वाढवल्या होत्या. वाहन उत्पादक कंपनीने या वर्षी केलेली ही तिसरी किंमत वाढ आहे. एप्रिल आणि जानेवारीमध्येही अशीच किंमत वाढ करण्यात आली होती. तर १ सप्टेंबर २०२५ पासून सुधारीत किमती लागू होतील, असे कंपनीने म्हटले आहे.