मुंबई : पतंजली फूड्स लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या गुरुवारी पार पडलेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत भागधारकांना बक्षीस (बोनस) समभाग देण्याला मंजूरी दिली. बक्षीस समभाग २:१ या प्रमाणात म्हणजेच ज्या भागधारकांकडे एक समभाग असेल त्यांना दोन रुपये दर्शनी मूल्य असलेले दोन समभाग बक्षीसरूपात विनामूल्य प्राप्त होतील.
कंपनीकडून अद्याप बक्षीस समभागासाठी पात्र होण्यासाठी रेकॉर्ड तारखेची घोषणा झालेली नाही. तथापि या बक्षीस समभाग योजनेत अंदाजे ७२.५० कोटी नवीन समभागांचे वाटप कंपनी करणार आहे. बक्षीस समभागाचे वाटप झाल्यानंतर, कंपनीचे एकूण भागभांडवल सध्याच्या १४५ कोटी रुपयांवरून २१७.५० कोटी रुपयांपर्यंत वाढेल.
कंपनीच्या ३१ मार्च २०२५ अखेर लेखापरीक्षित कामगिरीनुसार, पतंजली फूड्सकडे हे बक्षीस समभाग देण्यासाठी पुरेसा राखीव निधी आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत बक्षीस समभाग योजनेवर शिक्कामोर्तब झाल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत, म्हणजेच १६ सप्टेंबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी पात्र भागधारकांना हे बक्षीस समभाग मिळविता येतील, अशी अपेक्षा आहे. विद्यमान भागधारकांना मूल्यवृद्धीचा फायदा मिळवून देण्यासह भांडवली बाजारात कंपनीच्या समभागांची तरलता वाढवणे हे या निर्णयामागे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
मुंबई शेअर बाजारात पतंजली फूड्सचा समभाग गुरुवारच्या व्यवहाराअंती २.५५ टक्क्यांनी म्हणजे प्रत्येकी ४७.५० रुपयांनी वाढून १,९०९.७५ रुपयांवर बंद झाला. गत दिवसांतील व्यवहारात भाव तब्बल २५० रुपयांनी वधारला आहे. सध्याच्या शेअरच्या बाजार भावानुसार कंपनीचे ६८,४७० कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.