मुंबई : पुढील आठवड्यात अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करेल, या आशेने जागतिक बाजारातील तेजीसह शुक्रवारी देशांतर्गत निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी तेजी दर्शविली. भारत-अमेरिका व्यापार चर्चेच्या यशस्वी समाप्तीच्या वाढत्या आशावादामुळे बाजारातील तेजीला चालना मिळाली आहे.
सप्ताहअखेर सलग पाचव्या दिवशी भांडवली बाजार तेजीत होता, सेन्सेक्स ३५५.९७ अंशांनी वधारून ८१,९०४.७० पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ४४४.१२ अंशांची तेजी दर्शवत ८१,९९२.८५ या पातळीला स्पर्श केला. मात्र ८२,००० अंशांची पातळी गाठण्यास अयशस्वी ठरला. दुसरीकडे निफ्टी १०८.५० अंशांनी वधारून २५,११४ पातळीवर पोहोचला, सलग आठव्या सत्रात तेजी दिसून आली.
फेडच्या संभाव्य दर कपातीबद्दल जागतिक आशावादामुळे भारतीय भांडवली बाजार तीन आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला. अमेरिका-भारत व्यापार चर्चेतील प्रगतीमुळे नजीकच्या काळात सकारात्मक गती कायम राहण्याची अपेक्षा आहे, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारच्या सत्रात ३,४७२.३७ कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) ४,०४५.५४ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले, अशी माहिती मुंबई शेअर बाजाराने दिली.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, मारुती आणि टाटा मोटर्स यांचे समभाग तेजीसह बंद झाले. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, ट्रेंट आणि टायटन यांची कामगिरी निराशाजनक राहिली.