पीटीआय, नवी दिल्ली
व्हॉट्सॲपने नव्याने स्वीकारलेल्या गोपनीयता धोरणाच्या संदर्भात अनुचित व्यावसायिक प्रथांचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत, भारतीय स्पर्धा आयोगाने सोमवारी प्रमुख समाजमाध्यम आणि व्हॉट्सॲपची मालकी असलेल्या मेटाला २१३.१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला.

भारतीय स्पर्धा आयोगाने सोमवारी मेटाला बाजार वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल २१३.१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला, असे आदेशात म्हटले आहे. याशिवाय, स्पर्धेला मारक पद्धती थांबवण्याचे आणि अशा व्यवहार कुप्रथांपासून दूर राहण्याचे कठोर निर्देश आयोगाने मेटाला दिले आहेत.

हेही वाचा :बँकांची कर्ज परवडणारी हवीत – सीतारामन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हॉट्सॲपचे २०२१ मधील अद्ययावत गोपनीयता धोरण कसे लागू केले गेले आणि वापरकर्त्याचा डेटा कसा संकलित केला गेला आणि मेटाच्या छत्राखालील इतर कंपन्यांना ज्या तऱ्हेने पुरविला गेला, हे बाजारातील मक्तेदार स्थानाचा गैरवापरच सूचित करणारे असल्याचे आयोगाने हा आदेश पारित करताना म्हटले आहे. या आदेशानुसार स्पर्धाविरोधी पद्धतींचे निराकरण करण्यासाठी मेटा आणि व्हॉट्सॲपला देखील त्यांच्या वर्तणुकीशी संबंधित विशिष्ट उपाय नियत वेळेत लागू करण्यास सांगितले गेले आहे. भारतातील ऑनलाइन (डिस्प्ले) जाहिरातींमध्ये मेटाने प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत आघाडीचे स्थान मिळविण्यामागे याच कुप्रथा असल्याचा आयोगाचे म्हणणे आहे.