मुंबई: सिने प्रदर्शन उद्योगात अल्प-भांडवली गुंतवणुकीच्या प्रारूपातून वेगळेपण निर्माण करणाऱ्या कॉनप्लेक्स सिनेमाज लिमिटेडने प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून ९०.२७ कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. येत्या सोमवार, ११ ऑगस्टपर्यंत सुरू राहणाऱ्या या भागविक्रीत, प्रत्येकी १६८ रुपये ते १७७ रुपये किमतीला समभागांसाठी बोली लावता येईल.

कॉनप्लेक्सकडून पूर्णपणे फ्रँचाइझी तत्त्वावर देशभरात सात राज्यांत २५ मिनीप्लेक्स धाटणीची सिनेगृह चालविली जात असून, त्यातील एकूण पडद्यांची (स्क्रीन) संख्या ६६ आणि एकत्रित आसनक्षमता ५,०६० इतकी आहे. महाराष्ट्रातही अहिल्यानगर जिल्ह्यात तिचे एक सिनेगृह असून, नजीकच्या काळात राज्यातील एकूण पडद्यांची संख्या ३० वर नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, असे कॉनप्लेक्सचे व्यवस्थापकीय संचालक अनिश पटेल यांनी सांगितले. मल्टिप्लेक्सच्या तुलनेत आणखी कमी म्हणजे ६० ते ७५ आसनेच असणारी मिनीप्लेक्सच्या महानगरांबाहेरील तृतीय व चतुर्थ श्रेणी शहरांत विस्ताराला मोठा वाव असल्याचे आणि पुढील दोन वर्षांत पडद्यांची संख्या हजारांवर नेण्याचे लक्ष्य असल्याचे पटेल म्हणाले.

बीलाइन कॅपिटल ॲडव्हायझर्सकडून व्यवस्थापन होत असलेल्या ‘एसएमई आयपीओ’तून उभारल्या जाणाऱ्या निधीचा विनियोग हा एलईडी स्क्रीन आणि प्रोजेक्टर्स तसेच उद्यम कार्यालयाच्या खरेदीसाठी भांडवली खर्च तसेच खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी केली जाणार आहे.

आपली कंपनी ही मनोरंजन उद्योगातील ‘ओयो होम्स’ सारख्या नव कल्पनांसह परिवर्तनकारी बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नरत आहे. आगामी काळात कॉनप्लेक्सद्वारे संचालित मिनीप्लेक्समध्ये प्रोजेक्टरचा वापर केला जाणार नाही, तर त्याजागी मोठ्या एलईडी स्क्रीन्सचा वापर असलेले डिजिटल तंत्रज्ञान वापरात आणले जाईल, असे अनिश पटेल म्हणाले. या तंत्रज्ञानाच्या पेटंटसाठी कंपनीने अर्ज केला असल्याचे त्यांनी नमूद केले. हे व्यवसाय प्रारूप इतके अल्प-भांडवल लागणारे (ॲसेट-लाइट) आहे की, केवळ ५ लाख रुपयांत फ्रँचाइजी शुल्कासह ते राबविता येते आणि एका सिनेगृहाचा जमीन व बांधकामाचा खर्चही जवळपास दोन कोटींच्या आसपास राखला जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.