मुंबई: जागतिक स्तरावर उपलब्ध तज्ज्ञता, तंत्रज्ञान आणि नव पद्धतीचा वापर करून काँक्रिट आणि बांधकाम उद्योगाला प्रदूषणरहित बनविता येणे शक्य आहे, असा सूर ‘वर्ल्ड ऑफ कॉंक्रिट इंडिया २०२५’ च्या बुधवारी झालेल्या उद्घाटनसत्रात तज्ज्ञांनी व्यक्त केला. बांधकाम उद्योगाला वाहिलेले सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ ठरलेले हे तीन दिवसांचे प्रदर्शन गोरेगावस्थित नेस्को संकुलात ८ ते १० ऑक्टोबर दरम्यान होत असून, इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडियाने त्याचे आयोजन केले आहे.

पर्यावरणास हानीकारक कर्बवायू उत्सर्जनात सिमेंटचा वाटा जवळजवळ ६ टक्के असून, २०३० पर्यंत भारतातील सिमेंटचा वापर ५० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. तथापि शाश्वत मूल्याचे पालन करून पर्यावरणीय हानी कमी केली जाऊ शकते, असे मत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सिंह कंबोह यांनी व्यक्त केले. या अंगाने तंत्रज्ञानात्मक प्रगतीचे अनेक नमुने यंदाच्या प्रदर्शनात आहेत. या उपायांना नियामक तसेच धोरणात्मक पाठबळाची जोड मिळाली तर ते किफायतशीरही बनेल, असे त्यांनी नमूद केले.

हरित सिमेंट, अत्यल्प-कर्ब उत्सर्जनाचे पर्याय आणि सामग्री पुनर्वापरावर (रिसायकलिंग) आधारित बांधकाम पद्धतींकडे वेगाने वाटचाल करणे अपरिहार्य आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपमुख्य अभियंता डॉ. विशाल ठोंबरे यांनी नमूद केले. पालिकेकडून विशेषतः अलीकडच्या बांधकाम प्रकल्पात या शाश्वत पद्धतींचा आणि नवतंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील दोन-तीन वर्षात मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी लक्ष्याला या मार्गाने जाऊनच साध्य केले जाईल, असे ते म्हणाले.

इन्फॉर्मा मार्केट्सचे व्यवस्थापकीय संचालक योगेश मुद्रास म्हणाले, भारताचे बांधकाम क्षेत्र एका महत्त्वाच्या वळणावर असून, २०३० पर्यंत २.१३ लाख कोटी डॉलरच्या उलाढालीपर्यंत पोहोचण्यास ते सज्ज झाले आहे. ही वाढ पंतप्रधान आवास योजना आणि पायाभूत सुविधांमधील वाढत्या गुंतवणुकीमुळे शक्य होणार आहे. मात्र कर्बवायू उत्सर्जन शून्यवत (नेट-झीरो) करण्याच्या लक्ष्यांच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असताना हरित तंत्रज्ञान स्वीकारणे आता ऐच्छिक नव्हे तर अत्यावश्यक बनले आहे.

वास्तुरचनाकार, अभियंते, बांधकाम सामग्री निर्माते, प्रकल्प विकासक, कंत्राटदार, सल्लागार, सरकारी प्राधिकरणे आणि धोरणकर्ते यांना एका व्यासपीठावर आणून आदानप्रदान शक्य बनविणारा हा उपक्रम आहे. तीन दिवसांच्या प्रदर्शनामध्ये १४,००० हून अधिक व्यापारी अभ्यागत, ३५० पेक्षा जास्त आघाडीचे ब्रँड आणि २५० प्रदर्शक सहभागी झाले आहेत. कोरिया, चीन, अमेरिका आणि स्पेन यासारख्या देशांचे यात मजबूत प्रतिनिधित्व आहे.