Retail Inflation : महागाई कमी होण्याचा ट्रेंड जवळपास संपुष्टात आला असून, जून महिन्यात किरकोळ महागाई दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्याने जूनमध्ये किरकोळ महागाई दर तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. जूनमध्ये किरकोळ महागाई ४.८१ टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे, जी मेमध्ये ४.३१ टक्‍क्‍यांवर होती. सरकारने बुधवारी ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित महागाईची आकडेवारी जाहीर केली. किरकोळ महागाई मे महिन्यात ४.३१ टक्के होती, तर एक वर्षापूर्वी जून २०२२ मध्ये ती सात टक्के होती.

सरकारी आकडेवारीनुसार, जूनमध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर ४.४९ टक्के होता, तर मे महिन्यात तो २.९६ टक्के होता. सीपीआयमध्ये अन्न उत्पादनांचे वजन जवळपास निम्मे मोजले जाते. जूनमध्ये किरकोळ महागाई वाढली असली तरी ती रिझर्व्ह बँकेच्या सहा टक्क्यांच्या समाधानकारक पातळीपेक्षा खाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किरकोळ महागाई २ ते ४ टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याची जबाबदारी केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेवर सोपवली आहे. रिझर्व्ह बँक किरकोळ चलनवाढीची आकडेवारी लक्षात घेऊन द्वि-मासिक चलनविषयक आढावा घेते. गेल्या महिन्याच्या चलनविषयक आढाव्यात रिझर्व्ह बँकेने पॉलिसी रेट रेपो ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला होता. याबरोबरच एप्रिल-जून तिमाहीत किरकोळ चलनवाढीचा दर ४.६ टक्के राहण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला होता.