मुंबई: सीमापार तणाव वाढल्याने रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ४५ पैशांनी घसरून ८४.८० पातळीवर बंद झाला. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हल्ल्यांनंतर सीमापार तणाव वाढला असून, त्याचे देशांतर्गत चलन बाजारात अस्थिरतादर्शक परिणाम दिसून आले.

परकीय चलन विनिमय बाजारात, रुपयाने ८४.६५ प्रति डॉलर पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. दिवसभरातील सत्रात त्याने ८४.४७ चा उच्चांक आणि ८४.९३ रुपये प्रति डॉलर अशी नीचांकी पातळी गाठली होती. मंगळवारच्या सत्रात, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी घसरून रुपया ८४.३५ पातळीवर स्थिरावला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमकुवत डॉलर आणि देशांतर्गत तसेच जागतिक भांडवली बाजारांतील सकारात्मकतेमुळे रुपया डॉलरच्या तुलनेत सावरेल, अशी अपेक्षा आहे. परदेशी गुंतवणूकदारांचा निधी प्रवाह देखील रुपयाला आधार देत आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील वाढता युद्धसदृश तणाव आणि खनिज तेलाच्या किमतीमधील तीव्र चढ-उताराच्या शक्यतेने रुपयात घसरण होण्याची शक्यता आहे, असे मिरॅ ॲसेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी म्हणाले. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर अपरिवर्तित राखले जाण्याची अपेक्षा आहे. रुपया येत्या काही सत्रात ८४.४० ते ८५.१० या श्रेणीत व्यापार करण्याची अपेक्षा आहे.