पीटीआय, नवी दिल्ली
देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन १० ऑक्टोबरपर्यंत वार्षिक तुलनेत १८.३ टक्क्यांनी वाढून ११.२५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. यंदा वैयक्तिक प्राप्तिकर संकलन वाढल्याने एकूण कर महसूल वाढला असल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले. वैयक्तिक प्राप्तिकर संकलन ५.९८ लाख कोटी, तर कंपन्यांकडून ४.९४ लाख कोटी रुपयांचे यंदा कर संकलन झाले आहे. तर भांडवली बाजरातील रोखे व्यवहार कराच्या (एसटीटी) माध्यमातून ३०,६३० कोटी रुपयांची भर पडली आहे. तर इतर कर (इक्वलायझेशन लेव्ही आणि बक्षीस करासह) २,१५० कोटी रुपये सरकारने कमावले आहेत.

वर्षभरापूर्वी याच काळात प्राप्तिकर विभागाने ९.५१ लाख कोटी रुपये जमा केले होते. १ एप्रिल ते १० ऑक्टोबर २०२४ दरम्यान २.३१ लाख कोटी रुपयांचा परतावा (रिफंड) वितरित करण्यात आला, त्यातही वार्षिक तुलनेत ४६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

हेही वाचा : Gold Silver Rate Today : दसऱ्याच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात वाढ! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ढोबळ आधारावर, आर्थिक वर्षाच्या सात महिन्यांत (१० ऑक्टोबरपर्यंत) प्रत्यक्ष कर संकलन २२.३ टक्क्यांनी वाढून १३.५७ लाख कोटी रुपये झाले आहे. संकलनामध्ये ७.१३ लाख कोटी रुपयांचा वैयक्तिक प्राप्तिकर आणि ६.११ लाख कोटी रुपयांचा कंपनी कर समाविष्ट आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करातून २२.०७ लाख कोटी रुपये गोळा करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.