पीटीआय, नवी दिल्ली:अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेप्रमणे येत्या २७ ऑगस्टपासून ५० टक्के कर लागू झाल्यास भारताचे सकल देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) वाढ सुमारे ३० आधारबिंदूंनी आकुंचन पावत ६ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता मूडीज रेटिंग्जने शुक्रवारी व्यक्त केली.

अमेरिकेकडून तूर्तास २५ टक्के आयातशुल्क लादले गेले असले तरी देशांतर्गत दमदार मागणी आणि सेवा क्षेत्राची ताकद भारतीय अर्थव्यवस्थेवरील ताण कमी करेल, असे मूडीजने म्हटले आहे. अमेरिकेच्या वाढीव आयात शुल्कामुळे विकासदर, महागाई आणि बाह्य स्थितीवर निश्चितच परिणाम होईल, असे त्यांनी सांगितले.अमेरिकेने सर्व भारतीय आयातीवर ६ ऑगस्टपासून २५ टक्के आयात कर लागू केला, या व्यतिरिक्त २५ टक्के असा एकूण कर ५० टक्क्यांपर्यंत कर वाढविला जाणार आहे. भारताने रशियाकडून खनिज तेल आयात सुरूच ठेवल्याने त्यावर दंडात्मक कारवाई करत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. याचा परिणाम म्हणून २०२५-२६ मध्ये देशाचा विकासदर ०.३ टक्के कमी होऊन ६.३ टक्क्यांवरून ६ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता मूडीजने व्यक्त केली आहे.

भारत आणि अमेरिकेमध्ये मार्चपासून व्यापार करारावर वाटाघाटी सुरू आहेत. ज्याचा उद्देश २०३० पर्यंत वस्तू आणि सेवांचा द्विपक्षीय व्यापार सध्याच्या १९१ अब्ज डॉलरवरून ५०० अब्ज डॉलरपर्यंत करणे असा आहे. आतापर्यंत, चर्चेच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या असल्या तरी सहमती होऊ शकलेली नाही. सहाव्या फेरीसाठी, अमेरिकी शिष्टमंडळ २५ ऑगस्टपासून भारत दौऱ्यावर येत आहेत. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत कराराचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

रशियन तेलाचा मोठा आयातदार

वर्ष २०२२ पासून, भारताने रशियाकडून स्वस्त दरात खनिज तेलाची आयात वाढविल्यामुळे, एकूण तेल आयात खर्च घटण्यासह, त्याचा महागाईला रोखणारा परिणामही दिसला आहे. शिवाय चालू खात्यावरील तूट देखील कमी झाली आहे, असे मूडीजने म्हटले आहे. रशियन तेलाच्या सर्वात मोठ्या खरेदीदारांपैकी भारत एक आहे. रशियन तेलाची आयात २०२१ मधील २.८ अब्ज डॉलरवरून, २०२४ मध्ये ५६.८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.