मुंबई: इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केल्याचे विपरित परिणाम शुक्रवारी भारतीय बाजारातही दिसून आले. वस्तू वायदे बाजारात सोन्याने प्रति १० ग्रॅममागे प्रथमच १ लाख रुपयांपुढील पातळी गाठली, तर खनिज तेलाच्या वायदे किमतीही सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहोचल्या. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ५५ पैशांनी कमकुवत बनलेल्या रुपयाने या तेजीला आणखी इंधन पुरविले.
इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तरासाठी इराणने सुरू केलेल्या हालचाली आणि दक्षिण-आशियातील युद्ध भडक्याने तेल पुरवठ्यात व्यत्यय येण्याची चिंतेतून संपूर्ण जगभरात वस्तू आणि भांडवली बाजारात शुक्रवारी भीतीदायी पडसाद उमटले. भारतात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोन्याचा भाव शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात वाढला. सकाळी सत्राच्या सुरुवातीलाच २,०११ रुपयांच्या वाढीसह, सोने प्रति १० ग्रॅमसाठी १,००,४०३ रुपयांच्या अभूतपूर्व उच्चांकावर पोहोचले. एमसीएक्सवर, ऑगस्टसाठी सर्वाधिक व्यापार झालेले करार सोन्याचेच होेते.
इस्रायल-इराण संघर्षामुळे गुंतवणुकीचे सुरक्षित ठिकाण म्हणून सोन्याच्या मागणीतील वाढ आणि अमेरिकी डॉलरच्या मजबूतीमुळे ‘एमसीएक्स’वर सोन्याच्या किमती नवीन उच्चांकावर पोहोचल्या, असे ‘बॉम्बे बुलियन मेटल हब एलएलपी’चे संचालक मृणेश जैन म्हणाले. भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे आयात केलेले सोने महाग झाले आहे, ज्यामुळे देशांतर्गत किमती आणखी वाढल्या आहेत. सोन्याबरोबरीनेच दुसरा मौल्यवान धातू असलेल्या चांदीतही शुक्रवारच्या सत्रात वाढ दिसून आली. एमसीएक्सवर सकाळच्या सत्रात चांदीमध्ये ०.७ टक्क्यांची होऊन, त्यात किलोमागे १,०६,६५७ रुपये पातळीवर व्यवहार होताना दिसून आले.
आंतरराष्ट्रीय किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे शुक्रवारी एमसीएक्सवर खनिज तेलाच्या किमती पिंपामागे ५७८ रुपयांनी वाढून ६,३११ रुपयांच्या आजीवन उच्चांकावर पोहोचल्या. जुलैसाठी सर्वाधिक व्यापार झालेल्या कच्च्या तेलाच्या डिलिव्हरी करारांमध्ये ५७८ रुपये किंवा १०.०८ टक्क्यांनी वाढ झाली आणि सकाळच्या व्यवहारात पिंपामागे ६,३११ रुपयांचा नवीन उच्चांक त्याने गाठला. या आधी १ एप्रिल रोजी एमसीएक्सवर तेलाच्या वायद्यांचा भाव पिंपामागे ६,११६ रुपयांच्या तत्कालीन विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता.
जागतिक स्तरावर, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड ६.११ टक्क्यांनी वाढून प्रति पिंप ७२.२० डॉलरवर व्यवहार करत होता. सत्रातंर्गत ९.५४ डॉलरच्या किंवा १४.०२ टक्क्यांनी वाढून ते ७७.५८ डॉलरच्या दिवसांतर्गत उच्चांकावर पोहोचले होते. ब्रेंट क्रूड पिंपामागे ६.८५ टक्क्यांनी वाढून ७४.११ डॉलरवर व्यवहार करत होता. पिंपामागे ७८.५० डॉलरचा दिवसातील त्याचा उच्चांक होता. तेलाच्या वायद्यांमध्ये गत दोन महिन्यांतील सर्वाधिक १० टक्क्यांहून अधिक वाढ अल्पावधीतच घडून आली आहे.
रुपया ५५ पैशांनी कमकुवत
तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील वाढ आणि अमेरिकी चलन मजबूत झाल्यामुळे शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ५५ पैशांनी घसरून ८६.०७ वर बंद झाला. आंतरबँक परकीय चलन बाजारात, रुपया डॉलरच्या तुलनेत ७३ पैशांच्या पडझडीने ८६.२५ च्या नीचांकावर खुला झाला. रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून हस्तक्षेप केला गेल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे तो तात्पुरता ८५.९२ या दिवसांतील उच्चांकी पातळीवर परतला. परंतु देशांतर्गत भांडवली बाजारातील नकारात्मकता आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी समभाग विकून बाहेर पडण्याचा सपाटा सुरू केल्याने रुपयातील घसरणीला आणखी हातभार लागला.
खनिज तेलाच्या किमती चिंतेचा विषय बनला असून, त्यातील पिंपामागे १० डॉलरच्या वाढीच्या परिणामी देशाची व्यापार तूट १२ अब्ज डॉलरने आणि ३ टक्क्यांखाली ओसरलेल्या किरकोळ महागाई दरातही अर्धा टक्क्यांची वाढ संभवते.- अनिल कुमार भन्साळी, कार्यकारी संचालक, फिनरेक्स ट्रेझरी ॲडव्हायजर्स