विद्युत वाहन निर्मिती करणारी जगातील अग्रणी कंपनी टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी ५०० अब्ज डॉलर अर्थात ४४.३३ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे धनी बनले आहेत. इतक्या धनसंपदेचा टप्पा गाठणारे ते जगातील पहिले व्यक्ती आहेत. ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन ‘फोर्ब्स’च्या यादीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, त्यांची एकूण संपत्ती ३५०.७ अब्ज डॉलर आहे.
फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, बुधवारी (१ ऑक्टोबर) अमेरिकी बाजारातील व्यवहार आटोपले तेव्हा एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती ५०० अब्ज डॉलरवर पोहोचली. टेस्लाच्या शेअरमध्ये ३.३१ टक्क्यांनी वाढ झाल्याने एकाच सत्रात मस्क यांच्या एकूण संपत्तीत मोठी वाढ झाली. गेल्या १० वर्षांत मस्क यांची संपत्ती ३४ पटीने वाढली आहे. टेस्लाच्या शेअरमध्ये वाढीसह समूहातील इतर तंत्रज्ञान क्षेत्रातील नवउद्यमींचे (टेक स्टार्टअप्स) देखील मूल्यांकन वाढल्याने हा टप्पा त्यांना गाठता आला.
टेस्लाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष रॉबिन डेनहोम यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, व्हाईट हाऊसमध्ये अनेक महिने राहिल्यानंतर मस्क कंपनीत पुन्हा केंद्रस्थानी परतले आहेत. मस्क यांनी कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि रोबोटिक्समध्ये १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करून टेस्लाच्या भविष्यासाठी मोठ्या योजना आखल्या आहेत.
टेस्लाचे समभाग तेजीत
टेस्लाचे बाजारभांडवल सुमारे १.४४ लाख कोटी डॉलरवर म्हणजेच १२७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या वर्षी आतापर्यंत हा समभाग १४ टक्क्यांनी वधारला आहे. बुधवारच्या सत्रात ३.३ टक्क्यांनी वाढला. यामुळे मस्क यांच्या एकूण संपत्तीत थेट ६ अब्ज डॉलरची भर पडली. गुरुवारच्या सत्रात टेस्लाचा समभाग १४.७४ डॉलरबे वधारून ४६० डॉलरवर व्यवहार करत स्थिरावला. गेल्या वर्षात टेस्लाच्या समभागाने ७८ टक्के परतावा दिला होता. मस्क यांनी टेस्लाबरोबरच अंतराळ प्रक्षेपण क्षेत्रात स्पेसएक्स आणि न्यूरालिंक यासारख्या कंपन्यांची स्थापना केली आहे. या कंपन्यांचे मूल्यांकन देखील दिवसेंदिवस वाढते आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार, स्पेसएक्स निधी उभारण्याची योजना आखत आहे, ज्यामध्ये कंपनीचे मूल्य सुमारे ४०० अब्ज डॉलर असल्याचे बोलले जात आहे.