पीटीआय, नवी दिल्ली

देशाची वस्तू व सेवा निर्यात चालू आर्थिक वर्षात ८०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडेल आणि सरकारकडून मिळत असलेले पाठबळ आणि देशांतर्गत उत्पादकांची स्पर्धात्मक उत्पादनांमुळे हे शक्य होईल, असा अंदाज ‘ॲपरेल मेड-अप्स अँड होम फर्निशिंग क्षेत्र कौशल्य परिषदे’चे अध्यक्ष ए. शक्तीवेल यांनी गुरूवारी व्यक्त केला.

शक्तीवेल म्हणाले की, उद्योगांमधील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. व्यवसायस्नेही वातावरणाला प्रोत्साहन देत असतानाच नियमांचा बोजा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात भारताची एकूण निर्यात ८०० अब्ज डॉलरचा  टप्पा ओलांडेल, असा मला विश्वास आहे. उत्पादनाशी निगडित प्रोत्साहनपर योजनेमुळे निर्मिती क्षेत्राला मोठा फायदा झाला आहे.

हेही वाचा >>>सेवा क्षेत्राच्या निर्देशांकाची ऑक्टोबरमध्ये मुसंडी

भू-राजकीय स्थिती आव्हानात्मक असतानाही विकसनशील आणि विकसित अर्थव्यवस्थांमधून भारतीय निर्यातदारांना चांगले कार्यादेश मिळत आहेत.केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल हे नियमितपणे सर्व घटकांशी संवाद साधत आहेत. लाल समुद्रातील संकटाचा परिणाम कमी करण्यासाठी ते जहाज उद्योगाशीही सातत्याने चर्चा करीत आहेत, असे शक्तीवेल यांनी नमूद केले. दरम्यान, गेल्या आर्थिक वर्षात भारताची एकूण निर्यात ७७८ अब्ज डॉलर होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निर्यातीत एक टक्का वाढ

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताची एकूण निर्यात २१३.२२ अब्ज डॉलर असून, आयात ३५०.६६ अब्ज डॉलर झाली. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत निर्यातीत एक टक्का वाढ नोंदविण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत व्यापार तूट (आयात-निर्यातीतील तफावत) १३७.४४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.