पीटीआय, वृत्तसंस्था
जागतिक पातळीवर संरक्षणवादी धोरणांमध्ये वाढ झाली असून, त्यातून जागतिक पुरवठा साखळीत उलथापालथ होण्याचा धोका आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज आहे, अशी भूमिका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी जागतिक व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर मांडली.
मुंबई शेअर बाजाराच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सीतारामन बोलत होत्या. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जशास तशा आयात शुल्काच्या धोरणावर त्यांनी अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, जागतिक पातळीवर संरक्षणवादी धोरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होणार असून, उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. भारत हा जागतिक उलथापालथीच्या काळात धोरणातील लवचीकता आणि दीर्घकालीन गुंतवणुकीच्या बळावर वाटचाल करेल.
जागतिक पातळीवरील वातावरण गुंतागुंतीचे बनले असून, व्यापार धोरणात बदल करणे अतिशय आव्हानात्मक आहे. अशा परिस्थितीतही भारतीय वित्तीय बाजारपेठ भक्कम आहे. जागतिक पातळीवर अनिश्चितता असतानाही भारतीय भांडवली बाजार सुस्थितीत आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांचा त्यावरील विश्वास आणि सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची भूमिका केवळ सहभागाची नसून, नेतृत्व करण्याची बनली आहे. त्यातून भारतीय भांडवली बाजाराची परिपक्वता समोर येत आहे, असे सीतारामन यांनी नमूद केले.
जशास तशा कराचा तिढा
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतासह जवळपास सर्वच देशांवर जशास तसे कर आकारण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या या नवीन धोरणानुसार भारताच्या बहुतांश उत्पादनांवर अतिरिक्त २६ टक्के आयात शुल्क आकारण्यात येईल. अमेरिकेच्या प्रशासनाने नवीन शुल्काची अंमलबजावणी ९० दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. या कालावधीत चीन वगळता सर्वच देशांना अमेरिकेसोबत चर्चा करून शुल्कात तडजोड करण्याची संधी मिळणार आहे. अमेरिकेच्या अतिरिक्त आयात शुल्काला उत्तर म्हणून अनेक देशांनी अतिरिक्त शुल्काची घोषणा केली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर व्यापारयुद्धाची शक्यता निर्माण झाली आहे.