वृत्तसंस्था, नवी दिल्ली
विद्यमान वर्षात भारताच्या उद्योगजगतात सुमारे ८ अब्ज डॉलर मूल्याचे संपादन आणि विलीनीकरणाचे सौदे पार पडले. यामध्ये वित्त क्षेत्राचा वाटा मोठा राहिला असून २०२५ या वर्षात अनेक मोठे सौदे झाले आहेत, ज्यात परदेशी बँकांनी भारतीय बँक आणि वित्तसंस्थांमध्ये लक्षणीय हिस्सेदारी खरेदी केली आहे.

जानेवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान, वित्त क्षेत्रात ८ अब्ज डॉलर मूल्याचे संपादन आणि विलीनीकरण झाले आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १२७ टक्के अधिक आहे, असे सल्लागार संस्था ग्रँट थॉर्नटनकडून सांगण्यात आले. या प्रमुख सौद्यांमध्ये एमिरेट्स एनबीडी – आरबीएल बँक, एसएमबीसी – येस बँक, ब्लॅकस्टोन-फेडरल बँक, आयएचसी- सम्मान कॅपिटल यांचा समावेश आहे.

एमिरेट्स एनबीडी – आरबीएल बँक

दुबईस्थित बँक एमिरेट्स एनबीडीने तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक करून आरबीएल बँकेतील ६० टक्के हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे भारतीय वित्त क्षेत्रातील आतापर्यंतचे मोठे परदेशी अधिग्रहण आहे.

एसएमबीसी – येस बँक

मे महिन्यात, जपानच्या सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनने (एसएमबीसी) येस बँकेतील २० टक्के हिस्सा १.६ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करण्यास सहमती दर्शविली. २०२० मध्ये दिवाळखोरीत निघालेल्या येस बँकेला वाचवणाऱ्या भारतीय बँकांच्या गटाकडून त्यांनी हा हिस्सा खरेदी केला. सप्टेंबरमध्ये त्यांनी अतिरिक्त ४.९९ टक्के हिस्सा खरेदी केला.

ब्लॅकस्टोन – फेडरल बँक

सिंगापूरस्थित ब्लॅकस्टोनने एका सहयोगी कंपनीमार्फत विद्यमान ऑक्टोबरमध्ये भारताच्या फेडरल बँकेत ६,१९७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास सहमती दर्शविली, ज्या माध्यमातून फेडरल बँकेचा ९.९ टक्के हिस्सा खरेदी केला जाणार आहे.

आयएचसी – सम्मान कॅपिटल

अबू धाबीच्या इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने ( आयएचसी) गृहकर्ज क्षेत्रात कार्यरत बॅंकेतर वित्तीय कंपनी (एनबीएफसी) असलेल्या सम्मान कॅपिटलमध्ये ४३.५ टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी सुमारे १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यास सहमती दर्शविली.

बेन कॅपिटल – मणप्पुरम फायनान्स

मार्चमध्ये, बेन कॅपिटलने ५० कोटी डॉलरमध्ये मणप्पुरम फायनान्समधील १८ टक्के हिस्सा खरेदी करण्यास सहमती दर्शविली. बेन कॅपिटल हिस्सा ४० टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. मणप्पुरम ही ५,३०० हून अधिक शाखा असलेली एक आघाडीची सुवर्णकर्ज देणारी एनबीएफसी आहे.

बजाज ग्रुप – अलायन्झ

मार्चमध्ये, भारतातील बजाज समूहाने त्यांच्या दोन संयुक्त उपक्रम कंपन्यांमधील २६ टक्के हिस्सा – बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स लिमिटेड आणि बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स लिमिटेड – त्यांच्या संयुक्त उपक्रम भागीदार अलायन्झकडून २.८ अब्ज डॉलरमध्ये परत विकत घेतला, ज्यामुळे दशकभराची भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर अलायन्झने रिलायन्सच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसशी करार केला आणि सामान्य आणि आयुर्विमा व्यवसायात पाय रोवले.