पीटीआय, नवी दिल्ली

केंद्र सरकारचे महसुली उत्पन्न आणि खर्च यातील दरी असणारी वित्तीय तूट एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत ६.४३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी सरकारच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत हे प्रमाण ३६ टक्के आहे. विद्यमान आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने १७.८७ लाख कोटी रुपयांच्या वित्तीय तुटीचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

ऑगस्टमध्ये केंद्राची वित्तीय तूट केवळ ३७,२३३ कोटी रुपये नोंदवण्यात आली. जी मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ८१ टक्क्यांनी कमी आहे. ऑगस्टमध्ये निव्वळ कर महसुलात वाढ झाल्याचा हा सुपरिणाम आहे. या महिन्यांतीलएकूण प्राप्ती चार पटीने वाढून २.५४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एप्रिल-जुलै या कालावधीत तूट ६.०६ लाख कोटी नोंदवण्यात आली होती. तसेच गेल्या वर्षी एप्रिल-ऑगस्ट २०२२ या कालावधीत वित्तीय तूट वार्षिक (२०२२-२३) लक्ष्याच्या ३२.६ टक्के होती.

हेही वाचा – कच्च्या तेलावर विंडफॉल कर वाढला, एटीएफ आणि डिझेलवरील निर्यात शुल्क केले कमी

महसुली आघाडीवर, कंपनी कराचे संकलन ऑगस्ट २०२२ च्या तुलनेत पाच पटींनी वाढून यंदाच्या ऑगस्टमध्ये ६२,८१७ कोटी रुपये झाले २०२३-२४ मधील आतापर्यंतचे दुसरे सर्वोच्च मासिक कर संकलन आहे. त्याच वेळी, नक्त प्राप्तिकर संकलनही चौपट वाढून १.०३ लाख कोटी रुपये झाले.

हेही वाचा – त्रिशतकी झेप घेत ‘सेन्सेक्स’चा सप्ताहाला निरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय अर्थसंकल्पात, सरकारने चालू २०२३-२४ या आर्थिक वर्षात वित्तीय तूट सकल देशाअंतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ५.९ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ही तूट २०२२-२३ मध्ये जीडीपीच्या ६.४ टक्के होती, जी करोना साथीच्या वर्षातील ६.७१ टक्क्यांवरून कमी करण्यात आले. २०२३-२४ च्या एप्रिल-ऑगस्ट कालावधीत निव्वळ कर महसूल ८.०३ लाख कोटी रुपये म्हणजेच अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ३४.५ टक्के होता. तर केंद्राचा पहिल्या पाच महिन्यांतील एकूण खर्च १६.७१ लाख कोटी रुपये आहे, जो अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ३७.१ टक्के इतका आहे. एकूण खर्चापैकी १२.९७ लाख कोटी रुपये महसुली खात्यावर आणि ३.७३ लाख कोटी रुपये भांडवली खात्यावर खर्च झाले आहेत.