Gautam Adani recall shares crash blame manipulated script for erased 100 billion dollars in days : व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये बोलताना ‘अदाणी ग्रुप’चे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी काही महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी अदाणी यांनी कशा पद्धतीने एका ‘खोट्या कथानकामुळे’ त्यांचे साम्राज्य हादरून गेले आणि अगदी काही दिवसांतच त्यांच्या कंपनीच्या बाजारमूल्यात १०० अब्ज डॉलर्सची घसरण झाली याबद्दल भाष्य केले. तसेच खोट्या गोष्टी किती वेगाने पसरतात आणि लोकांच्या धारणा कशा प्रभावित करतात हेच यातून दिसून येते, असेही ते म्हणाले
गौतम अदाणी यांनी सांगितले की, जानेवारी २०२३ मध्ये अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने त्यांच्या समूहाविरोधात एक ‘नियोजित हल्ला’ केला होता. या रिपोर्टमध्ये अदाणी कंपन्यांवर स्टॉकमध्ये फेरफार आणि अकाउंटींग फ्रॉड केल्याचे आरोप करण्यात आले होते.
“तो फक्त एक रिपोर्ट नव्हता, तर शंका निर्माण करण्यासाठी फेरफार केलेली एक स्क्रिप्ट होती,” असे अदाणी म्हणाले. यामुळे काही दिवसांतच अदाणी समुहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रकमेचे बाजारमुल्य नाहीसे झाले. पुढे ते म्हणाले की, हे झाले तरीही, “कोणत्याही मूलभूत गोष्टी बदलल्या नव्हत्या, आणि कोणतीही तथ्य खोटी ठरली नव्हती.”
अदाणी यांनी या प्रसंगाचा पार्श्वभूमीवर सध्याच्या जगात स्टोरीटेलिंगची महत्त्व कसे वाढत आहे, याबद्दल देखील भाष्य केले. “नरेटिव्हज हे सिनेमापुरते मर्यादीत राहिलेले नाहीत. ते बाजार हलवतात, जागतिक राजकारणाला आकार देतात आणि याबरोबर लोकांचे भविष्यही नव्याने लिहितात,” असे अदाणी म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी इशारा दिला की, खोट्या गोष्टी जर जगभर पसरल्या, तर फक्त काही बातम्यांच्या मथळ्यांनी कित्येक वर्षांची मेहनत वाया जाऊ शकते.
सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने अदाणी समूहाला क्लिन चीट दिल्यानंतर गौतम अदाणींचे हे विधान आले आहे. सेबीने कंपन्यांमधील व्यवहार हे फसवणुकीचे नव्हते आणि पैसा वळवण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सत्य मोठ्याने सांगितले पाहिजे…
दरम्यान त्यांच्या अनुभवाबद्दल बोलताना, शांतता धोकादायक असू शकते हे आपण शिकलो, असे अदाणी यांनी सांगितले. “आजच्या जगात सत्य हे देखील मोठ्याने सांगितले गेले पाहिजे. शांत राहिल्यास इतरांना तुमचे नशीब लिहिण्याची संधी मिळते,” असे अदाणी म्हणाले.
अदाणी यांना यावेळी त्यांच्या वैयक्तिक प्रवासाबद्दलही भाष्य केले, ते म्हणाले की, ‘डॉन’ आणि ‘जंजीर’ सारख्या चित्रपटांनी त्यांच्यातील स्वप्नाळू व्यक्तीला प्रेरणा दिली. “जगातील काही महान स्टोरीटेलरन्सनी मला माझी स्वत:ची स्टोरी शोधण्यात मदत केली, ती बॅलन्स शीट किंवा बोर्डरूममधून नाही, तर माझ्या आठवणींच्या रील्समधून,” असे अदाणी म्हणाले.
सिनेमा, स्टोरीटेलिंग आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून भारताने त्याच्या जागतिक प्रतिमेचे नेतृत्व स्वत:कडे घ्यावे, असे आवाहन अदाणी यांनी केले. “आपण कोण आहोत हे आपण सांगितले नाही, तर इतर लोक आपण कोण आहोत हे नव्याने लिहितील ,” असे अदाणी म्हणाले.
‘गांधी’ आणि ‘स्लमडॉग मिलियनेअर’ सारख्या चित्रपटांचे उदाहरण देत, भारताच्या कथा या अनेकदा पाश्चात्त्य दृष्टिकोनातून मांडल्या गेल्या असे अदाणी म्हणाले. “शांतता म्हणजे विनम्रता नाही; ते आत्मसमर्पण आहे,” असे अदाणी यावेळी म्हणाले.