‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अदानी समूहाने बनविलेल्या ड्रोन आणि ड्रोन-रोधक प्रणालीने निर्णायक भूमिका बजावली, असे अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी मंगळवारी समूहातील कंपनीच्या भागधारकांच्या वार्षिक सभेत बोलताना सांगितले. भारतीय सशस्त्र दलांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा थेट बदला घेण्यासाठी सुरू केलेल्या दहशतवादविरोधी लढाईत अदानी डिफेन्सने तयार केलेल्या ड्रोनचा वापर केल्याचा दावा गौतम अदानी यांनी केला.
ड्रोनने अचूक हल्ले केले तर प्रत्युत्तराच्या धोक्यांपासून भारतीय मालमत्तेचे ड्रोनरोधक प्रणालीने रक्षण केले. ड्रोन हे आकाशातील डोळे तसेच हल्ल्याच्या तलवारीही बनल्या, तर अँटी-ड्रोन प्रणालीने सैन्याचे आणि नागरिकांचे ढाल बनून रक्षण केले असे, गौतम अदानी म्हणाले.अल्फा डिझाइन टेक्नॉलॉजीज (२६ टक्के हिस्सेदारीसह अदानी डिफेन्सची संयुक्त मालकी) आणि इस्रायलच्या एल्बिट सिस्टम्स यांच्या भागीदारीत विकसित केलेले, स्कायस्ट्रायकर आणि कामिकाझे ड्रोन ५-१० किलो वजनाचे युद्धसामग्री वाहून नेण्यास सक्षम आहेत.
आखाती देशांमधील भू-राजकीय अस्थिरतेपासून ते युरोपीय देशांमधील आर्थिक अशांततेपर्यंत अशा बाह्य अडचणी असूनही, दूरदर्शी धोरण आणि धाडसी राष्ट्रीय हेतूमुळे भारतीय अर्थव्यवस्था विकासाचा दीपस्तंभ म्हणून उभी राहिली आहे. शिवाय अदानी समूहाने जागतिक प्रशासन मानकांचे पालन केले असून कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. जागतिक पातळीवर समूहावर करण्यात आलेले आरोप निराधार आहेत, असे अदानी यांनी स्प्ष्ट केले.
समूहाने एकत्रित २.७१ लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. तर ८९,८०६ रुपयांचा नफा नोंदवला आहे. आगामी पाच वर्षांत वार्षिक भांडवली खर्च १५-२० अब्ज डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.