पीटीआय, नवी दिल्ली
सोन्याच्या भावातील तेजीची मालिका बुधवारी कायम राहिली. दिल्लीतील सराफी बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ९८ हजार १०० रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहोचला. याच वेळी चांदीचा भाव ९९ हजार ४०० रुपयांवर गेला. सोने आणि चांदीच्या भावाची एक लाख रुपयांच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
दिल्लीतील सराफी बाजारपेठेत सोन्याचा भावाने बुधवारी १ हजार ६५० रुपयांची उसळी घेतली. सोन्याचा भाव ९८ हजार १०० या सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहोचला. याच वेळी चांदीच्या भावात प्रतिकिलो १ हजार ९०० रुपयांची वाढ होऊन तो ९९ हजार ४०० रुपयांवर गेला, अशी माहिती ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिली. दरम्यान, जागतिक वायदे बाजारात सोन्याचा भाव प्रतिऔंस ३ हजार २९९ डॉलरवर पोहोचला. आशियाई वायदे बाजारात चांदीचा भाव प्रतिऔंस २ टक्क्यांनी वधारून ३२.८६ डॉलरवर गेला.
महत्त्वाच्या खनिजांवरील अतिरिक्त आयात शुल्काची आवश्यकता आहे की नाही, याची तपासणी करण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. यामुळे भांडवली बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेने चीनच्या वस्तूंवरील आयात शुल्क २४५ टक्क्यांवर नेले आहे. यामुळे भांडवली गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक पर्याय असलेल्या सोन्याकडे मोर्चा वळविला आहे. त्यातून सोन्यासह चांदीच्या भावात तेजीची मालिका सुरू आहे. आगामी काळात ही तेजीची मालिका कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अमेरिकेने चीनवरील आयात शुल्कात आणखी वाढ केली आहे. यामुळे व्यापार युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. त्यातून सोन्याच्या मागणी वाढली असून, भाव उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.
कायनात चैनवाला, विश्लेषक, कोटक सिक्युरिटीज