मुंबई: गुंतवणूकदारांना मौल्यवान धातूमध्ये गुंतवणुकीसाठी परवडणारा आणि सुरक्षित मार्ग मिळवून देणारा ‘एक्सचेंज ट्रेडेड फंड’ अर्थात ईटीएफ योजना चॉइस म्युच्युअल फंडाने दाखल केल्याची शुक्रवारी घोषणा केली.

‘चॉइस गोल्ड ईटीएफ’ ही योजना गुंतवणूकदारांना सोन्याच्या दीर्घकालीन वाढीच्या क्षमतेचा फायदा घेण्यासाठी एक सोपा, सुरक्षित आणि तरल मार्ग प्रदान करेल, असे चॉइस म्युच्युअल फंडाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नवीन फंड प्रस्तुती अर्थात एनएफओ २४ ऑक्टोबरपासून खुला झाला असून, ३१ ऑक्टोबरपर्यंत खुली राहील. ही गुंतवणुकीस कायम खुली अर्थात ओपन-एंडेड योजना असून, देशांतर्गत सोन्याच्या किमतींनुसार परतावा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. एनएफओ कालावधी दरम्यान किमान गुंतवणूक १००० रुपये आहे आणि त्यानंतर एका आठवड्याच्या आत या फंडाचे युनिट हे बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर बाजारावर सूचीबद्ध केले जातील.

महागाई आणि बाजारातील अस्थिरतेवर मात करून दीर्घकालीन परतावा देण्याची क्षमता असलेले सोने सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या युगातील एक सर्वोत्तम मालमत्ता आहे. भौतिक सोन्याइतकेच बाजार मूल्य आणि वाढीची क्षमता ईटीएफ योजना प्रदान करते, परंतु गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष स्वरूपाचा सोने साठवणुकीचा कोणतीही जोखीम न उचलता हा लाभ मिळतो, असे चॉइस म्युच्युअल फंडाचे सीईओ अजय केजरीवाल म्हणाले.