How This Indian-Origin Executive Got Hired At Goldman Sachs after 39 Interviews : ‘गोल्डमन सॅक्स’मध्ये नोकरी मिळवणे हे अनेकदा हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवण्यापेक्षाही कठीण मानले जाते. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहणारे माजी वेल्थ मॅनेजर तसेच भारतीय वंशाचे उद्योजक शरण श्रीवत्सा यांनी ही प्रक्रिया कशी होती याबद्दल माहिती दिली आहे. त्यांना ही नोकरी मिळवण्यासाठी ३९ वन-ऑन-वन मुलाखती द्याव्या लागल्या आणि त्यापैकी एक मुलाखत एका मिनिटापेक्षाही कमी काळाची होती, पण त्या मुलाखतीने त्यांच्यासाठी सर्वकाही बदलून टाकले.
श्रीवत्सा यानी त्यांची स्टोरी ही पहिल्यांदा टिकटॉकवर शेअर केली केली, नंतर ‘फॉर्च्यून’ या मासिकाने यासंबंधी वृत्त दिले आहे. यामध्ये एमबीए पूर्ण केल्यानंतर नोकरी शोधत असल्याच्या दिवसांची आठवण सांगताना श्रीवत्सा यांनी एका मुलाखती बद्दल माहिती दिली आहे, या नोकरीसाठीच्या मुलाखतीत एका मॅनेजिंग डायरेक्टरने त्यांची एका अनोख्या प्रकारे चाचणी घेतली होती.
“ते (मॅनेजिंग डायरेक्टर) पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत आले. त्यांनी भले मोठे लेदरचे बायंडर डेस्कवर ठेवले आणि ते म्हणाले, तू हॉटशॉट आहेस. असे हॉटशॉट्स मी येथे नेहमीच येताना पाहतो. तू माझ्यासाठी एक मीटिंग ठरवू शकतोस का ते बघूया,” असे श्रीवत्सा म्हणाले. आणि त्यांनी पुढे सांगितलं की त्या फाईलमध्ये लोकांची नावे आणि फोन नंबर्ससह संपर्काची माहिती होती.
श्रीवत्सा म्हणाले की अशावेळी बहुतेक उमेदवारांना लगेचच त्यांचे सेल्समधील कौशल्य दाखवून देण्यासाठी कोल्ड कॉल्स करणे सुरू केले असते. पण याऐवजी ते थोडं थांबले आणि त्यांनी विचारले, “मी तिला कॉल करायला तयार आहे. तुमच्याकडे स्किप्ट किंवा तसं काही आहे का? कारण मी तुमचे प्रतिनिधीत्व चांगल्या पद्धतीने करू इच्छितो.”
मॅनेजिंग डायरेक्टरांनी लगेचं उरकते घेतले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि म्हणाले, “यू विल बी ग्रेट , किड (मुला, तू खूप छान काम करशील), ” आणि ते निघून गेले. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्यातील हा संवाद अवघे ४६ सेकंद चालला, असे श्रीवात्सा यांनी नमूद केले. यानंतर, त्यांना एका कॉकटेल पार्टीत तेच मॅनेजिंग डायरेक्टर पुन्हा भेटले, यावेळी त्यांनी विचारलं की, “मला माफ करा, पण ती मुलाखत फक्त ४६ सेकंदाची होती. मी काय बोरबर किंवा चूक केली?”
गोल्डमन सॅक्सचे मॅनेजिंग पार्टनर तेव्हा म्हणाले की, “तुम्ही एकमेव व्यक्ती होतास ज्याने थेट फोन उचलला नाही आणि ज्याला मी एक हॉटशॉट आहे हे सिद्ध करायचे नव्हते. तुम्ही मार्गदर्शन मागितले. ज्यामुळे माझा विश्वास बसला की तुम्ही प्रशिक्षण देण्या योग्य आहात.”
श्रीवत्सा यांनी २००७ मध्ये इन्व्हेस्टमेंट मॅनेजर म्हणून इन्हेस्टमेंट बँकिंग कंपनीत कामाला सुरूवात केली आणि उद्योग उभे करण्यासाठी त्यांनी २०१० मध्ये ही कंपनी सोडली. येथे काम करण्याच्या अनुभवबद्दल सांगितले की, येथून त्यांना विनम्रता आणि शिकण्याची तयारी हे फुशारकी मारण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असते हे शिकता आले.
गोल्डमन सॅक्सची निवड प्रक्रिया कशी असते?
वॉल स्ट्रीटवरील या कंपनीचे भरती निकष हे आजही जगात सर्वात कठीण मानले जातात. त्यांच्या २०२५ च्या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी ३,६०,००० हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते, परंतु त्यांनी केवळ २,५०० उमेदवारांची निवड केली. म्हणजेच त्यांच्याकडे स्वीकारले जाण्याचा दर हा फक्त ०.७ टक्के होता, जो हार्वर्ड विद्यापीठापेक्षाही कमी आहे.
हार्वर्ड विद्यापीठाचा अंडरग्रॅज्युएट्स अॅक्सेप्टन्स दर हा ३.६ टक्के आहे, म्हणजे तो गोल्डमन सॅक्स इंटर्नशिपच्या ५ पटीने अधिक आहे. विशेष म्हणजे, गोल्डमन सॅक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डेव्हिड सोलोमन यांनाही कंपनीने दोन वेळा नाकारले होते.
“गोल्डमन सॅक्सची ‘सुपरडे’ इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये सामान्यतः एक किंवा दोन दिवसांत सलग अनेक मुलाखती घेतल्या जातात, ज्या ३ ते ६ मुलाखत घेणाऱ्यांबरोबर असतात. ज्यामध्ये उमेदवाराची क्षमता आणि कल्चरल फिट तपासण्यासाठी तांत्रिक प्रश्न, वर्तणूकीचे मूल्यांकन आणि केस स्टडीजचा समावेश असतो. गोल्डमन सॅक्समध्ये जाण्यासाठी श्रीवत्सा यांना ३९ वैयक्तिक इंटरव्ह्यू द्यावे लागले.
