नवी दिल्लीः वस्तू व सेवा कर (जीएसटी) सुधारणांची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली आणि यातून कौटुंबिक किराणा आणि दैनंदिन खर्चात १३ टक्के बचत होणार आहे. याचबरोबर छोट्या मोटारीची खरेदी करताना सुमारे ७० हजार रुपये वाचतील, असा केंद्र सरकारचा दावा आहे.

स्टेशनरी, कपडे. पादत्राणे आणि औषधांवरील जीएसटी कमी झाल्याने ७ ते १२ टक्के बचत होणार आहे. वैयक्तिक आरोग्य विमा आणि आयुर्विम्याला जीएसटीतून वगळण्यात आल्याने ही बचत १८ टक्क्यांपर्यत जाऊ शकते, असा सरकारचा अंदाज आहे. जीएसटी सुधारणांमुळे ३७५ वस्तू स्वस्त झाल्या आहेत. त्यात किराणा वस्तू, कृषी उपकरणे, कपडे, औषधे आणि वाहनांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी कपातीला ‘जीएसटी बचत उत्सव’ असे नाव दिले आहे.

आता १८०० सीसीपर्यंत इंजिन क्षमता असलेल्या ट्रॅक्टरच्या खरेदीत ४० हजार रुपये वाचणार आहेत. आधी ट्रॅक्टरवरील जीएसटी १२ ते १८ टक्के होता. तो आता ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. याचबरोबर ३५० सीसी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकी आणि स्कूटरच्या खरेदीत ८ हजार रुपयांची बचत होईल. दूरचित्रवाणी संचाच्या (३२ इंचावरील) खरेदीत ३ हजार ५०० रुपयांची बचत होईल. वातानुकूलन यंत्रावरील (एसी) जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणण्यात आल्याने त्यांच्या खरेदीत २ हजार ८०० रुपयांची बचत होणार आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.

कराचे दोनच टप्पे

जीएसटीमध्ये आधी शून्य, ५, १२, १८ आणि २८ टक्के असे कराचे पाच टप्पे होते. आता सरकारने केवळ ५ व १८ टक्के असे दोन टप्पे आणि ४० टक्के विशेष कर अशी रचना केली आहे. यामुळे आधी १२ टक्के कर टप्प्यात असलेली ९९ टक्के उत्पादने ही आता ५ टक्के कर टप्प्यात आली आहेत. याचवेळी २८ टक्के कर टप्प्यात असलेली ९० टक्के उत्पादने १८ कर टप्प्यात आली आहेत.

वह्या उत्पादकांची फेरविचाराची मागणी

सरकारचा उदात्त हेतू वह्यांवरील कराचा भार कमी करणे आणि विद्यार्थ्यांसाठी त्या परवडणारे बनविणे असा असला तरी, प्रत्यक्षात यातून नेमके उलट घडेल, असा युक्तिवाद पुस्तक उत्पादक संघटनेने केला आहे. कर्नाटक पेपर अँड स्टेशनरी ट्रेडर्स असोसिएशनने प्रसिद्धीस निवेदनांत म्हटले आहे की, पुस्तके, आलेख पुस्तके, वह्या तसेच तत्सम उत्पादने बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदासाठी ‘शून्य’ दराची रचना अस्तित्वात आली आहे. वह्या उत्पादक इनपुट टॅक्स क्रेडिट अर्थात परताव्याचा दावा करण्यास अपात्र ठरल्याने प्रत्यक्षात त्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे. परताव्याच्या दाव्याअभावी आयुर्विमा आणि आरोग्यविमा हप्त्यांचा दर येत्या काळात वाढण्याची शक्यता विमा उद्योगातूनही वर्तविली जात आहे.