मुंबई: शेअर बाजारातील आधुनिक दलाली पेढी असलेल्या ‘ग्रो’ने त्यांच्या मंचावर आता कमॉडिटीज ट्रेडिंग सुरू केले आहे. यामुळे ग्राहकांना शेअर बाजाराबरोबरच कमॉडिटी बाजारात व्यवहार करता येणे शक्य होणार आहे.
‘ग्रो’ने संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, ‘ग्रो’च्या कमॉडिटी मंचावरून ग्राहक सकाळी ९ ते रात्री ११:३० वाजेपर्यंत मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवर खनिज तेल, सोने, चांदी आणि नैसर्गिक वायू यासारख्या वस्तूंमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार करू शकतील. सध्या भारतातील व्यापारी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी आणि बाजारातील अस्थिरतेपासून बचाव करण्यासाठी कमॉडिटीजमध्ये गुंतवणूक करण्यात वाढत्या प्रमाणात रस दाखवत असल्याने, हा व्यवहार विस्तार करण्यात आला आहे.
आगामी काळात ‘ग्रो’ प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून निधी उभारू इच्छित आहे. यामुळे भांडवली बाजारात सूचिबद्धतेसाठी धोरणात्मक विविधीकरणाच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कंपनी सेवा विस्तार करत आहे. कंपनी रोखे (कॉर्पोरेट बाँड), मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी, संपत्ती व्यवस्थापन या सेवाही ग्रोकडून सुरू झाल्या आहेत. सध्या, ग्रोचे १.८० कोटींहून अधिक सक्रिय ग्राहक असून, म्युच्युअल फंडातील सर्वाधिक ‘एसआयपी’ खात्यांची नोंदणी तिने केली आहे.
गेल्या महिन्यात, ‘ग्रो’ची मूळ कंपनी असलेल्या बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्सने भांडवली बाजार नियामक सेबीकडे प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) साठी गोपनीय मसुदा प्रस्ताव दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रस्तावित आयपीओचे आकारमान ७,००० कोटी रुपयांच्या घरात जाणार असेल.