लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेची उपकंपनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) प्रति समभाग ७०० ते ७४० रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. या माध्यमातून कंपनीने १२ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी उभारणी प्रस्तावित केली आहे.
एचडीबीची प्रारंभिक समभाग विक्री येत्या २५ जूनपासून सुरू होणार आहे. पुढील तीन दिवस म्हणजे २७ जूनपर्यंत या आयपीओसाठी अर्ज करता येईल. सुकाणू गुंतवणूकदारांना बोली लावण्यासाठी हा आयपीओ २४ जूनला खुला होईल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी २ हजार ५०० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री करणार आहे. प्रवर्तक कंपनी एचडीएफसी बँक ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून एचडीबीच्या १० हजार कोटींच्या समभागांची विक्री करणार आहे. बिगर बँकिंग वित्तीय कंपनी असलेल्या एचडीबीमध्ये एचडीएफसी बँकेचा ९४.३६ टक्के हिस्सा आहे.
आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या निधीतून कंपनी भविष्यातील भांडवली गरजांच्या पूर्ततेसोबत अतिरिक्त कर्ज वितरण आणि व्यवसाय विस्तार करणार आहे. रिझर्व्ह बँकेने मोठ्या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना तीन वर्षांत सूचिबद्ध करण्याचे बंधन ऑक्टोबर २०२२ मध्ये घातले होते. त्यानुसार, एचडीबीकड़ून सूचिबद्ध होण्याचे पाऊल उचलले आहे. कंपनी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात २ जुलैला सूचिबद्ध होणे अपेक्षित आहे.