मुंबई : म्युच्युअल फंड व्यवस्थापनातील आघाडीची कंपनी असलेल्या एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या (एएमसी) संचालक मंडळाने पहिल्यांदाच बक्षीस समभाग (बोनस शेअर) देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने एकास एक (१:१) बक्षीस समभाग देण्याची शिफारस केली आहे.
कंपनीकडून बक्षीस समभागासाठी अद्याप रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. दरम्यान सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात २४.६० टक्के वाढ झाली असून तो ७१८.४३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने ५७६.६१ कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. मात्र याआधीच्या तिमाहीत ७४७.९२ कोटी रुपयांचा नफा मिळवला होता.
सरलेल्या तिमाहीत महसूल १५.८० टक्क्यांनी वाढून १०२७.४० कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ८८७.२१ कोटी रुपये होता. जून २०२५ च्या तिमाहीतील ९६७.७६ कोटी रुपयांवरून त्यात ६.१२ टक्के वाढ झाली आहे.
मुंबई शेअर बाजारात एचडीएफसी एएमसीचा समभाग ३.०४ टक्क्यांनी म्हणजेच १७० रुपयांनी वधारून ५,७६४ रुपयांवर बंद झाला आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे १,२३,३५१ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.