लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदीचे मनाशी बाळगलेले स्वप्न हे घसरलेल्या किमतींमुळे अनेकांना पूर्ण करता येईल. निवडक कार आणि दुचाकींवरील वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) दर सध्याच्या २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याने, या दिवाळीत वाहनांच्या किमती लक्षणीय कमी होण्याचे संकेत आहेत.

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे, जीएसटी सुसूत्रीकरण प्रस्तावाअंतर्गत १२ टक्के आणि २८ टक्क्यांचे दर टप्पे काढून टाकले जातील आणि त्याऐवजी केवळ ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच दरांचे टप्पे असतील. अर्थात २८ टक्के कर दराच्या टप्प्यात असलेल्या वाहनांवर नव्याने १८ टक्क्यांचा दर लागू होईल.

किमान २५ हजारांची बचत शक्य

केंद्राच्या जीएसटी दरातील सुसूत्रीकरण प्रस्तावाचा सर्वाधिक लाभ हा वाहनांच्या बाजारपेठेला होणे अपेक्षित असून, मोटारींच्या किमती अनेकांसाठी परवडणाऱ्या श्रेणीत येण्याची अशी अपेक्षा आहे. कोणत्याही वाहनाच्या एक्स-शोरूम किंमतीत जीएसटी समाविष्ट असतो. करात कपात केल्याने एक्स-शोरूम किंमत थेट कमी होईल आणि त्यामुळे पर्यायाने वाहनाची ऑन-द-रोड किंमत देखील कमी होईल. विशेषत: ४० टक्क्यांच्या नव्याने प्रस्तावित जीएसटी दराच्या कक्षेत येणाऱ्या आलिशान मोटारी वगळल्या, तर सर्वच छोट्या मोटारी, सेदान, एसयूव्ही तसेच दुचाकींना या कर कपातीचा लाभ होईल. खरेदीदारांना मिळू शकणारा लाभ किती, तर ‘प्राइमस पार्टनर्स’चे उपाध्यक्ष निखिल ढाका यांनी या गणिताची उकल केली आहे. त्यांच्या मते, कार आणि दुचाकी वाहनांवरील प्रस्तावित जीएसटी कपातीमुळे एंट्री-लेव्हल मॉडेल्सवर २०,००० ते २५,००० रुपयांची किमान बचत करणे खरेदीदारांना शक्य होईल.

शेअर्समध्ये तेजीचे प्रत्यंतर

या प्रस्तावित कर सुधारणांचे शेअर बाजाराने सोमवारी उत्साहाने स्वागत केले. बाजार खुला होताच सेन्सेक्सने १,००० अंशांनी झेप घेतली. बाजारात ऑटो शेअर्सना मोठी मागणी होती. मुख्यत्वे हिरो मोटोकॉर्पच्या शेअर्समध्ये जवळपास ९ टक्क्यांनी वाढ झाली आणि बाजार बंद होताना तो ६ टक्के वाढीसह, ४,९८३.८५ रुपयांवर स्थिरावला. बरोबरीने मारुती सुझुकी इंडिया ९ टक्के वाढीसह १४,०७५.३० रुपयांवर बंद झाला. अशोक लेलँड ८.१२ टक्के (१३१.८५ रुपये), ह्युंदाई मोटर इंडिया ८.४५ टक्के (२,४२७.२० रुपये), टीव्हीएस मोटर कंपनी ६.६० टक्के (३,२२०.२५ रुपये), बजाज ऑटो ४.५२ टक्के (८,५८०.२० रुपये), महिंद्र अँड महिंद्र ३.५४ टक्के (३,३८०.९५ रुपये), आयशर मोटर्स (२.४६ टक्के) आणि टाटा मोटर्स (१.७८ टक्के) अशी मुंबई शेअर बाजारात सर्वच वाहन निर्मात्या कंपन्यांमध्ये वाढ दिसून आली. या परिणामी ‘बीएसई ऑटो इंडेक्स’ ४.४८ टक्क्यांनी वाढून ५६,३७१.२३ वर पोहोचला.

आगामी व्यापक सुधारणांमध्ये, इंजिन क्षमता आणि वाहनाच्या आकाराशी संबंधित वर्गीकरण अशा किचकट तरतुदी संपुष्टात येऊन, सध्या सर्वोच्च कर टप्प्यांत असलेल्या दरांची पुनर्रचना केली जाईल. ज्यामुळे शेवटी सामान्य माणसाला फायदा होईल आणि गेले वर्षभर मरगळलेल्या वाहन बाजारपेठेतही चैतन्य येईल. देशातील सर्वाधिक खपाची वाहन निर्मात्या मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी जीएसटी कर तर्कसंगत करण्याच्या पावलांचे स्वागत केले आणि या सुधारणांचे निश्चितच चांगले परिणाम दिसून येतील, असा विश्वास ‘रॉयटर्स’ बोलताना व्यक्त केला.