पीटीआय, नवी दिल्ली

किंमतवाढीचा ताण, मंदावलेली मागणी आणि वाढत्या भू-राजकीय प्रतिकूलतेमुळे सरलेल्या मे महिन्यात देशाच्या उत्पादन क्षेत्राला सुस्ती जडल्याचे आणि क्रियाकलाप तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरल्याचे सोमवारी प्रसिद्ध झालेल्या मासिक सर्वेक्षणाने स्पष्ट केले. उत्पादन क्षेत्रातील सक्रियतेचे मापन करणारा ‘एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय)’ हा एप्रिलमधील ५८.२ गुणांकावरून मे महिन्यात ५७.६ गुणांवर घसरला. या क्षेत्रात कार्यस्थितीत फेब्रुवारीनंतरची सर्वात कमकुवत सुधारणा यातून दर्शविली गेली आहे.  

तथापि पीएमआयच्या परिभाषेत, ५० पेक्षा जास्त गुण हे विस्तार दर्शविणारे, तर ५० पेक्षा कमी गुण म्हणजे आकुंचन दर्शविणारे असते. या अंगाने मे महिन्यात उत्पादन क्षेत्रातील व्यवसाय परिस्थितीत सुधारणा दिसून आली असली, तरी विस्ताराचा दर तीन महिन्यांतील सर्वात कमकुवत राहिला, असे सर्वेक्षण सूचित करते.

जरी उत्पादनात वाढ आणि नवीन कार्यादेशांचा दर मागील महिन्यापेक्षा कमी झाला असला, तरी मे महिन्यातील उत्पादन क्षेत्राच्या ‘पीएमआय’ने  आणखी एका महिन्यात चांगली वाढ नोंदविली. विशेषत: रोजगार वाढीतील वेग नवीन शिखरावर पोहोचणे निश्चितच सकारात्मक आहे, असे एचएसबीसीच्या मुख्य भारतीय अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी नमूद केले.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोजगारवाढ नवीन शिखरावर

अनेक कंपन्यांनी मे महिन्यात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले, ज्यामुळे रोजगार निर्मितीचा दर एका नवीन विक्रमावर पोहोचला. उल्लेखनीय म्हणजे जास्त कर्मचारी भरती नोंदवणाऱ्या १२ टक्के कंपन्यांमध्ये, अल्पकालीन पदांपेक्षा कायमस्वरूपी नोकऱ्यांची भरती ही तुलनेने अधिक होती. शिवाय, रोजगार निर्मितीतील सातत्यामुळे उत्पादकांना मे महिन्यात त्यांच्या कामांची पूर्तताही करता आली.