मुंबई : चालू आठवड्यात प्राथमिक बाजाराला एकसाथ धडक देणाऱ्या पाच कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्रीला (आयपीओ) गुंतवणूकदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. केंद्राच्या मालकीच्या इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी अर्थात ‘इरेडा’सह, टाटा टेक्नॉलॉजीज, गांधार ऑइल रिफायनरी इंडिया, फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीज आणि फेडबँक फायनान्शियलच्या समभागांसाठी अर्जांचा पाऊस पडला. या माध्यमातून पाच कंपन्यांकडून एकत्रित सुमारे ७,३०० कोटी उभारले जाणार होते, प्रत्यक्षात त्यापेक्षा किती तरी अधिक २,४१,५४७ कोटी रुपयांच्या बोली गुंतवणूकदारांनी लावल्या.
टाटा टेक्नॉलॉजीज :
टाटा समूहातील ‘रत्नां’पैकी एक असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या आयपीओला सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांकडून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. बुधवारी सुरू झालेल्या भागविक्रीसाठी अवघ्या काही मिनिटांत दुप्पट भरणा झाला होता. अखेरच्या दिवशी (२४ नोव्हेंबर) ६९.४३ पट अधिक मागणी नोंदवण्यात आली. टाटा टेक्नॉलॉजीजकडून ‘आयपीओ’च्या माध्यमातून सुमारे ४.५० कोटी समभागांची विक्री करण्यात येणार आहे. समभाग विक्रीच्या अखेरच्या दिवशी एकत्रित सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांकडून ३११.८३ कोटी समभागांची मागणी नोंदवली गेली. भागविक्रीतून कंपनी ३,०४२ कोटी रुपयांचा निधी उभारू पाहात असताना, प्रत्यक्षात तिने १,५६,२११.७ कोटी रुपये मूल्याच्या समभागांसाठी मागणी मिळवली.
हेही वाचा : अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ बरखास्त, रिझर्व्ह बँकेकडून एक वर्षासाठी प्रशासकाची नियुक्ती
किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या हिश्शामध्ये जवळपास १६.५० पट भरणा झाला आहे. याचबरोबर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार वर्गवारींतून अनुक्रमे ६२.११ पट आणि २०३.४१ पटीने अधिक भरणा झाला आहे. कर्मचाऱ्यांसाठी राखीव हिश्शासाठी ३.७० पट, तर टाटा मोटर्सच्या भागधारकांसाठी राखीव हिश्शासाठी २९.१९ पट अधिक भरणा झाला आहे.
गांधार ऑइल रिफायनरी इंडिया
टाटा टेक्नॉलॉजीजनंतर गांधार ऑइल रिफायनरी इंडियाच्या आयपीओ खरेदीसाठी सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले. यामध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार वर्गवारींमध्ये १२९.०६ पट अधिक मागणी नोंदवली गेली. त्यापाठोपाठ गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ६४.३४ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून २९.९२ पट अधिक भरणा झाला. कंपनीने ‘आयपीओ’साठी १६० ते १६९ रुपये किंमतपट्टा निश्चित केला होता.
हेही वाचा : वॉरेन बफे यांची बर्कशायर हॅथवे ‘पेटीएम’मधून बाहेर
फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीज
फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीजच्या ५९३ कोटी रुपयांच्या आयपीओसाठी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या हिश्शामध्ये सुमारे १३.७३ पट भरणा झाला आहे. याचबरोबर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार वर्गवारींमध्ये अनुक्रमे ३५.२३ पट आणि १२२.०२ पटीने अधिक भरणा झाला आहे.
इरेडा
‘इरेडा’ची भागविक्री २३ नोव्हेंबरला बंद झाली होती. गुरुवारी दिवसअखेर किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीमध्ये सुमारे ७.७२ पट भरणा झाला आहे. याचबरोबर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार वर्गवारींमध्ये अनुक्रमे २४.१६ पट आणि १०४.५७ पटीने अधिक भरणा झाला.
फेडबँक फायनान्शियल
फेडबँक फायनान्शियलच्या आयपीओसाठी दिवसअखेर दुपटीहून अधिक भरणा झाला. मात्र इतर चार कंपन्यांच्या आयपीओच्या तुलनेत गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी होता. तरीही यामध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार वर्गवारींमध्ये ३.४८ पट अधिक मागणी नोंदवली गेली. त्यापाठोपाठ गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १.४९ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून १.८८ पट अधिक भरणा झाला.