पीटीआय, नवी दिल्ली
आघाडीची वाहन निर्मिती कंपनी असलेल्या ह्युंदाई मोटर इंडियाने येत्या तीन वर्षात कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा ३१ हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा बुधवारी केली. ह्युंदाईने १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२७ पर्यंत कर्मचाऱ्यांच्या पगारात टप्याटप्याने ३१,००० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनी आणि मान्यताप्राप्त युनियन ऑफ ह्युंदाई एम्प्लॉईज यांनी २०२४-२०२७ या कालावधीसाठी परस्पर फायदेशीर वेतन सामंजस्य करार यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची आणि त्यावर स्वाक्षरी केल्याची घोषणा केली आहे. बहुतेक तंत्रज्ञ/कामगार कॅडरसाठी दीर्घकालीन वेतन सामंजस्य करार १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू होईल, असे त्यात म्हटले आहे.

वेतन वाढ करारात या उद्योगातील सर्वोत्तम ३१,००० रुपयांची वेतन वाढ समाविष्ट आहे, जी तीन वर्षांच्या कालावधीत ५५ टक्के, २५ टक्के आणि २० टक्के या प्रमाणात दिली जाईल, असे ह्युंदाई मोटर इंडियाने म्हटले आहे. पगारवाढीव्यतिरिक्त, आरोग्य विमा आणि वेलनेस प्रोग्राम्ससारख्या उपक्रमांसह कर्मचारी कल्याण योजना सुरूच राहतील, असे त्यात म्हटले आहे.

परस्पर विश्वास, आदर आणि रचनात्मक संवादावर आधारित हा करार, कर्मचारी कल्याणाला प्राधान्य देणारी आणि दीर्घकालीन संघटनात्मक वाढीला पाठिंबा देणारी प्रगतीशील कार्यस्थळ संस्कृती वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे ह्युंदाई मोटर इंडिया फंक्शन हेड पीपल स्ट्रॅटेजी यंगम्युंग पार्क म्हणाले.

ह्युंदाई मोटर इंडियाचा समभाग मंगळावरच्या सत्रात १.८४ टक्क्यांनी वधारून २,६५०.९० रुपयांवर बंद झाला आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे २.१५ लाख कोटींचे बाजारभांडवल आहे.