मुंबई : आयसीआयसीआय बँकेची उपकंपनी असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडे प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून निधी उभारणीसाठी अर्ज केला आहे.
कंपनी आंशिक समभाग विक्रीच्या (ओएफएस) माध्यमातून १.७६ कोटी समभागांची विक्री करणार आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीमधील परदेशी भागीदार प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंग्ज १० टक्के समभाग विक्री करणार आहे. यात कोणत्याही नाव समभागांची विक्री करण्यात येणार नसल्याने कंपनीला कोणताही निधी प्राप्त होणार नाही.
आयसीआयसीआय बँकेने आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीमध्ये अतिरिक्त २ टक्के हिस्सा खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. सध्या, आयसीआयसीआय बँकेकडे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीची ५१ टक्के हिस्सेदारी आहे आणि परदेशी भागीदार प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंगकडे (पीएचसीएल) ४९ टक्के हिस्सा आहे. १९९८ पासून या कंपन्या संयुक्त उपक्रम म्हणून कार्यरत आहेत.
मसुदा प्रस्तावानुसार, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी ही देशातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे. जिचे मालमत्ता व्यवस्थापनात १३.३ टक्के योगदान आहे. ३१ मार्च २०२५ अखेरपर्यंत कंपनी १.४६ कोटी ग्राहकांना सेवा देते. सध्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीच्या १३५ म्युच्युअल फंड योजना कार्यरत आहेत, ज्यात ४२ इक्विटी अर्थात समभागसंलग्न योजना, २० रोखे संलग्न योजना, ५६ पॅसिव्ह फंड, १४ फंड-ऑफ-फंड डोमेस्टिक योजना, एक लिक्विड योजना, एक ओव्हरनाइट योजना आणि एक आर्बिट्रेज योजनेचा समावेश आहे.
३१ मार्च २०२५ पर्यंत कंपनीची एकूण मालमत्ता ४,३८४ कोटी होती. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये तिची वार्षिक उलाढाल ४,९८० कोटी रुपये असून २६.५१ कोटी करपश्चात नफा प्राप्त केला आहे.