मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के कर लादला असला तरी, गुरुवारी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने सत्राअखेर पुनरागमन केले. मुख्यतः सत्रातील अखेरच्या तासात गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावल्याने ९२६ अंशांच्या घसरणीतून सावरून सेन्सेक्स ८० अंशांनी वधारून बंद झाला.
दिवसाच्या नीचांकी पातळीपासून सुमारे ९२६ अंकांनी पुनरागमन करत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७९.२७ अंशांनी वधारून ८०,६२३.२६ पातळीवर स्थिरावला. सत्रात त्याने ८० हजार अंशांची पातळी ओलांडत ७९,८११.२९ या सत्रातील तळाला स्पर्श केला. मात्र सत्राअखेर सुरू झालेल्या समभाग खरेदीमुळे तोटा भरून काढण्यात मदत झाली आणि त्याने सत्रात ८०,७३७.५५ चा उच्चांक गाठला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २१.९५ अंशांची भर घातली आणि तो २४,५९६.१५ पातळीवर बंद झाला.
जगभरातील भांडवली बाजारांमध्ये अस्थिरता असूनही देशांतर्गत शेअर बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीवरून झपाट्याने सावरला. अमेरिकेने भारतावर केलेल्या मोठ्या प्रमाणातील शुल्कवाढीनंतर सकाळच्या सत्रातील समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे बाजारात घसरण झाली. आता ट्रम्प, पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यातील संभाव्य शांतता चर्चेच्या वृत्तामुळे व्यापाराबाबत अमेरिकेच्या नरमाईच्या भूमिकेची आशा निर्माण झाल्याने बाजार सावरला. या नव्या आशावादामुळे ऑटो, फार्मा, धातू आणि ऊर्जा क्षेत्रात जोरदार पुनरुज्जीवन झाले आणि बाजाराला पुन्हा सकारात्मक पातळीवर पोहोचवण्यास मदत झाली, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
अमेरिकेने वाढीव आयात शुल्कामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण आहे. रशियातून होणाऱ्या खनिज तेलाच्या आयातीमुळे दंडात्मक कारवाई म्हणून भारतीय वस्तूंवर एकूण कर ५० टक्क्यांपर्यंत कर लादला आहे. परिणामी कापड, सागरी आणि चामड्याच्या निर्यातीसारख्या क्षेत्रांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारताने या कर वाढीला अयोग्य, अन्याय्य आणि अवास्तव असल्याचे सांगत निषेध नोंदवला आहे.
भारताला ब्राझीलप्रमाणेच सर्वाधिक ५० टक्के अमेरिकी आयात शुल्क लागू होईल.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, टेक महिंद्र, एचसीएल टेक, अॅक्सिस बँक, मारुती, टाटा स्टील, एचडीएफसी बँक आणि एशियन पेंट्स यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर अदानी पोर्ट्स, ट्रेंट, टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एनटीपीसीच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, बुधवारी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४,९९९.१० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.
सेन्सेक्स ८०,६२३.२६ (+७९.२७)
निफ्टी २४,५९६.१५ (+२१.९५)
तेल ६७.३७ (+ ०.७२%)
डॉलर ८७.६९ (-२ पैसे)