नवी दिल्ली : देशातील सेवा क्षेत्राची चक्रे लक्षणीय गतिमान झाली असून, मे महिन्यात तिने १४ वर्षांतील तिसऱ्या सर्वाधिक सक्रियतेच्या पातळीला गाठले, याचबरोबर या महिन्यात रोजगार निर्मितीत सप्टेंबर २००६ पासूनची सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आल्याचे गुरुवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणातून समोर आले.

हेही वाचा >>> Gold-Silver Price: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी

देशातील निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा एचएसबीसी इंडियाचा संयुक्त पीएमआय निर्देशांक मे महिन्यात ६१.७ गुणांवर नोंदला गेला. एप्रिलमध्ये हा गुणांक ६१.५ होता. या निर्देशांकाने सलग ३४ व्या महिन्यात सकारात्मक कल दर्शविला आहे. मे महिन्याचा निर्मिती क्षेत्राचा अंतिम पीएमआय निर्देशांक ३ जूनला जाहीर होणार असून, तो ५८.४ गुणांवर राहील, असा अंदाज आहे. याचवेळी सेवा क्षेत्राचा अंतिम पीएमआय निर्देशांक ५ जूनला जाहीर होणार आहे. संयुक्त पीएमआय हा सर्वेक्षणात सहभागी निर्मिती व सेवा क्षेत्रातील ८०० पैकी ७५ ते ८५ टक्के सदस्यांची मते जाणून दरमहा तयार केला जातो.

हेही वाचा >>> भांडवली बाजाराचा विक्रमी सूर; सेन्सेक्स १,२०० अंशांच्या उसळीने ७५,४१८ पातळीवर

सर्वेक्षणातील सहभागींनी नवीन कार्यादेश आणि मागणीत झालेली वाढ यावर भर दिला आहे. याचबरोबर सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवसायात चांगली वाढ दिसून आली असून, ती आधीच्या चार महिन्यांतील सर्वाधिक आहे. याचवेळी निर्मिती क्षेत्राचा वेग फेब्रुवारीपासून तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे, असे सर्वेक्षणाने नमूद केले आहे.

नवीन कार्यादेश आणि उत्पादनात घट झाल्याने निर्मिती क्षेत्राचा वेग मे महिन्यात किंचित मंदावला आहे. मात्र, सेवा क्षेत्राच्या गतिमानतेमुळे संयुक्त पीएमआय निर्देशांक १४ वर्षांतील तिसरी सर्वाधिक सक्रियतेची पातळी दर्शविणारा आहे.

– प्रांजुल भंडारी, मुख्य अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी इंडिया