मुंबई : गेल्या काही सत्रातील मंदीला पूर्णविराम देत देशांतर्गत भांडवली बाजारातील निर्देशांकांनी गुरुवारी पुन्हा एकदा नव्या उच्चांकी पातळीला गवसणी घातली आहे. रिझर्व्ह बँकेने बुधवारी केंद्र सरकारला २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी २.११ लाख कोटी रुपयांचा सर्वोच्च लाभांश देण्यास मान्यता दिली. या रिझर्व्ह बँकेच्या कृतीने सेन्सेक्स आणि निफ्टीला उच्चांकी शिखरावर जाण्यास प्रवृत्त केले.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १,१९६.९८ अंशांनी वधारून ७५,४१८.०४ या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ७५,४९९.९१ अंशांचे विक्रमी शिखर गाठले. तर दुसरीकडे सेन्सेक्सच्या पावलांवर पाऊल ठेवत निफ्टीने देखील २३,००० अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्याने ३६९.८५ अंशांची भर घालत २२,९६७.६५ अंशांचा नवा उच्चांक गाठला.

हेही वाचा >>> Gold-Silver Price: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी

रिझर्व्ह बँकेने बुधवारी केंद्र सरकारला २.११ लाख कोटी रुपयांचा सर्वोच्च लाभांश दिला असून हा अर्थसंकल्पीय अपेक्षेपेक्षा दुप्पट राहिला आहे, ज्यामुळे नवीन सरकारला पदभार स्वीकारण्यापूर्वीचा मोठा महसूल प्राप्त झाला आहे. फेब्रुवारीला मांडलेल्या अर्थसंकल्पात, सरकारने रिझर्व्ह बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांकडून १.०२ लाख कोटी रुपयांच्या लाभांश उत्पन्नाचा अंदाजले होते. यामुळे वित्तीय तूट मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे. हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल ठरेल, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही के विजयकुमार म्हणाले.

हेही वाचा >>> बँक बचत खात्यांची ‘पोर्टेबिलिटी’ ग्राहकांच्या सक्षमतेसाठी गरजेचीच! रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांचे प्रतिपादन

जागतिक पातळीवर खनिज तेलाचे दर ८२ डॉलरच्या खाली घसरल्याने ही सकारात्मक बाब आहे. ते आता ८१.७९ डॉलर प्रतिपिंपापर्यंत खाली आले आहे. यामुळे भविष्यात आयात बिल कमी होण्याचीही अपेक्षा आहे. सेन्सेक्समध्ये लार्सन अँड टुब्रो, मारुती, महिंद्र अँड महिंद्र, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले. तर पॉवरग्रीड, सन फार्मा, एनटीपीसी आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या समभागात मात्र घसरण झाली.